आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाने म्हटले अपहरण झाले,पोलिसही चक्रावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती : शहरातील रतन गंज भागात राहणारा एक सोळा वर्षीय मुलगा शुक्रवारी (दि. २१) सकाळी घरून कामावर जातो, असे सांगून निघून गेला. मात्र तो सायंकाळपर्यंत घरी परत गेला नाही. दरम्यान शुक्रवारी रात्री त्याने कुटुंबीयांना फोन करून दोन ते तीन व्यक्ती माझे अपहरण करून रेल्वेतून घेवून जात असल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेवून तक्रार दिली. तोच शनिवारी (दि. २२) झाशी रेल्वे पोलिसांनी शहर पोलिसांना माहिती दिली की, एक अल्पवयीन मुलगा आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे नागपुरी गेट पोलिस व त्याचे कुटुंबीय त्याला घेण्यासाठी झाशीला रवाना झाले आहेत. 

 

शहरातील रतन गंज भागात राहणारा एक सोळा वर्षीय मुलगा शहरातील एका स्वस्त धान्य दुकानात काम करतो. या ठिकाणी कामावर जाण्यासाठी तो दरदिवशी सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडतो. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी आठ वाजता तो घराबाहेर पडला. मात्र सायंकाळी घरी पोहोचला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंतेत पडले. दरम्यान रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास मुलाचा फोन आला व त्याने सांगितले की, मला दोन ते तीन अनोळखी व्यक्ती अपहरण करून घेऊन जात आहे. रेल्वे सुरू आहे, ती कोणत्या दिशेने व कोणत्या गावी जात आहे, याबाबत माहिती नाही. त्यामुळे कुटुंबीय अधिकच भयभीत झाले. त्यानंतर त्याने आणखी काही वेळाने त्याच्या चुलत बहिणीला सुद्धा फोन करून असेच सांगितले. दरम्यान या प्रकरणाची तक्रार त्यांनी शनिवारी नागपुरी गेट पोलिसांकडे केली. पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला. याचदरम्यान झाशी रेल्वे पोलिसांकडून शहर पोलिसांना माहिती मिळाली की, एक मुलगा त्यांना सापडला असून तो अमरावतीचा रहिवासी असल्याचे सांगत आहे. त्यामुळे नागपुरी गेट पोलिसांनी झांशी रेल्वे पोलिसांसोबत संपर्क करून हा मुलगा अमरावतीचाच असल्याची खात्री पटवली. त्यामुळे शनिवारी सायंकाळीच त्या मुलाचे आईवडील आणि नागपुरी गेट पोलिस मुलाला ताब्यात घेण्यासाठी झाशीला रवाना झाले आहेत. मुलगा शहरात आल्यानंतर खरा प्रकार समोर येणार आहे. 


गुंगीचे औषध देऊन सोडून दिले! 
हा मुलगा झाशी रेल्वे पोलिसांकडे गेल्यानंतर त्याने झाशी पोलिसांना सांगितले की, काही लोकांनी माझे अपहरण करून आणले आहे. त्यांनी मला गुंगीचे औषध दिले होते. मला जाग आली असता मी या ठिकाणी पोहोचलो होतो, असे त्याने सांगितल्याचे झाशी पोलिसांनी शहर पोलिसांना सांगितले आहे. 

 

पथक व नातेवाईक रवाना 
मुलाने फोन करून सांगितले की, त्याचे दोन ते तीन व्यक्तींनी अपहरण केले आहे. तसेच झांशी पोलिसांनाही सांगितले आहे. मात्र मुलगा झांशीला रेल्वे पोलिसांकडे सुखरूप आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी आमचे पथक व त्याचे आईवडील रवाना झाले आहे. 
दिलीप चव्हाण, ठाणेदार, नागपुरी गेट. 
 

बातम्या आणखी आहेत...