आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामियात सीएएविरुद्ध आंदोलनात अल्पवयीन तरुणाचा गोळीबार, एक जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोळीबारात जखमी काश्मिरी विद्यार्थी शादाब फारूक एम्समध्ये दाखल आहे. - Divya Marathi
गोळीबारात जखमी काश्मिरी विद्यार्थी शादाब फारूक एम्समध्ये दाखल आहे.
  • पोलिस बनले मूकदर्शक; जामिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पोलिस मूकदर्शक बनल्याचा आरोप केला आहे.
  • गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर म्हणाला, ही घ्या तुमची 'आझादी'
  • ३ दिवसांपूर्वी मंत्री ठाकूर यांची गोली माराे... ची घोषणाबाजी
  • हा भाजपच्या चिथावणीचा परिणाम : विरोधी पक्ष

​​​​​नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभेचा धुरळा उडत असताना गुरुवारी विद्वेषाचे भयानक रूप दिसले. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला जामियानगरात सीएएविरुद्ध निदर्शनांत घुसलेल्या एका तरुणाने गोळीबार केला. तो 'ये लो आजादी' असे ओरडत होता. हाताला गोळी लागून जामियाचा विद्यार्थी शादाब फारुख जखमी झाला.अल्पवयीन हल्लेखोर बारावीत शिकत आहे. त्याला ताब्यात घेऊन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या विरोधात जामियात ७ तास निदर्शने सुरू होती. रात्री शेकडो निदर्शक पोलिस मुख्यालयापुढे पोहोचले. हा भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर भाषणांचा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेस व माकपने केला आहे.

जामियात राजघाटापर्यंत मोर्चा निघणार होता. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेडिंग केली होती. याच दरम्यान तरुणाने गोळीबार केला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी २७ जानेवारीला सभेत 'देश के गद्दाराें काे, गाेली माराे ... काे,' अशी घोषणाबाजी केली होती. भाजप खासदार प्रवेश वर्मा शाहीन बागच्या आंदोलकांबाबत म्हणाले होते, ते घरांत घुसून बलात्कार करतील. गृहमंत्री अमित शहांनीही ईव्हीएमचे बटण इतक्या रागात दाबा की त्याचा करंट शाहीन बागपर्यंत बसावा, असे म्हटलेले आहे. पराभवाच्या भीतीने भाजप दिल्लीची निवडणूक टाळण्याचा कट रचत असल्याचा आरोप आपचे खासदार संजय सिंह यांनी केला. दुसरीकडे, गृहमंत्री अमित शहांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

फेसबुकवर पोस्ट लिहिली : शाहीन भाग... खेल खत्म

हल्लेखोराच्या फेसबुक अकाउंटवरून तो बऱ्याच दिवसांपासून हल्ल्याची तयारी करत असल्याचे दिसते. आधी त्याने निदर्शकांत घुसून फेसबुक लाइव्ह केले. एका पोस्टमध्ये िलहिले होते की, आपण चंदनचा बदला घेण्यासाठी जात आहोत. २०१८ मध्ये प्रजासत्ताकदिनी यूपीत दंगलीत चंदन गुप्ताचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, अंत्यसंस्कारासाठी अापल्याला भगवे कपडे घालावे. अजून एका पोस्टमध्ये तो लिहितो, 'शाहीन भाग... खेल खत्म'. घटनेनंतर फेसबुकने त्याचे अकाउंट बंद करून टाकले.

कुस्तीसाठी तालमीतही जायचा, हिंदुत्ववादी संघटनांच्या संपर्कात

ग्रेटर नोएडा : हल्लेखोराच्या वडिलांचा जेवर गावात पानाचा ठेला आहे. आरोपी घरातील सर्वात थोरला मुलगा आहे. कुटुंबीयांनी सांगितले की गुरुवारी एक लग्नसाेहळा होता. सगळे त्यात व्यग्र होते. अारोपीही शाळेतून थेट लग्नघरी जात असल्याचे सांगून गेला होता. टीव्हीवर पाहूनच त्यांना घटनेची माहिती मिळाली. कुटंुबानुसार तो १५ दिवसांपासून मानसिकरीत्या त्रस्त होता. कधीही जय श्रीरामच्या घोषणा द्यायचा. त्याने कट्टा कुठून आणला हे कुटुंबीयांनाही माहीत नाही. आरोपीचे मित्र म्हणाले, तो कुस्तीसाठी तालमीत जायचा. याच काळात एका हिंदुत्ववादी संघटनेच्या संपर्कात आल्यापासून तालमीत गेला नाही.