आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - चार वर्षांच्या चिमुकलीच्या गळ्याला चाकू लावून अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी जिन्सी परिसरात उघडकीस आली. हा प्रकार मुलीच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीचा पाठलाग करत पोलिस कंट्रोल रूमला ही माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ बीड बायपासवर नाकेबंदी करून गाडी अडवून आरोपींना अटक केली. शुभम लक्ष्मण महेकले (२३), अन्वर पठाण (२२), हसन नूर खान (२२), संगमेश्वर रघुनाथ गाडे, (२५, सर्व रा. शास्त्रीनगर, लातूर) अशी आरोपींची नावे आहेत. धक्कादायक म्हणजे अन्वर हा नात्याने मुलीच्या आईचा मामा आहे.
बायजीपुरा परिसरात राहणाऱ्या चार वर्षीय मुलीच्या वडिलांचा गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मुलगी वडिलांसह घरी असताना आरोपी व मुलीच्या आईचा मामा असलेला अन्वर घरी आला. त्यांनी सोबत जेवण केले. त्यानंतर अन्वरने मुलीला सोबत घेत खुलताबाद येथील उरुसात नेतो, असे म्हणत बाहेर पडला. मुलीच्या वडिलांनी बाहेर जाऊन पाहिले असता तो तिला कारमध्ये (एमएच ०३ एआर ६३७६) बसवून वेगात निघाला. हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने मुलीच्या वडिलांनी तत्काळ दुचाकीवरून पाठलाग सुरू केला. रेल्वेस्टेशनजवळ पोहोचताच त्यांनी पोलिस कंट्रोल रूमला फोन करून हा प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ सातारा पोलिसांना ही माहिती देताच पोलिसांनी बीड बायपास वर नाकेबंदी करून एमआयटी महाविद्यालयाजवळ कारसह आरोपींना पकडले. मुलीची सुटका करून आरोपींना जिन्सी पोलिसांच्या ताब्यात दिले. गाडीत त्यांनी मुलीला मारहाण केल्याचेसुद्धा समोर आले. आरोपींकडे दोन चाकू होते. ते पोलिसांनी हस्तगत केले.निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके तपास करत आहेत.
वेगात पायी निघाला अन् संशय आला...
अन्वर मुलीला कडेवर घेऊन वेगात घराबाहेर पडला. त्याच्याकडे कार कुठून आली व तो इतका वेगात का गेला असे प्रश्न मनात आल्याने मुलीचे वडील तत्काळ घराबाहेर आले. याच वेळी अन्वरने तिला सोनेरी रंगाच्या कारमध्ये बसवले. त्यात आधीच सर्व तरुण बसलेले होते. सोबत शुभमसुद्धा होता. शुभमने मुलीच्या अपहरणाची धमकी दिली होती. त्यावरुन जिन्सी पोलिस ठाण्यात १९ नोव्हेंबर रोजी त्यांनी तक्रार दिली हाती. त्यामुळे त्यांना हा प्रकार संशयास्पद वाटला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.