आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किराडपुऱ्यात मद्यधुंद अल्पवयीन गुुंडाने घरमालकाला रस्त्यावर कात्रीने भोसकले 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- भाडेकरूंना का त्रास देतो, असा जाब विचारणाऱ्या घरमालक समद खान अहमद खान (४० ) यांचा एका अल्पवयीन गुंडाने कात्रीने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास किराडपुऱ्यात घडली. भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांचा थरकाप उडाला. समद यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन गुंडाने समद यांना भोसकल्यानंतर तिथून पळ काढला. जिन्सी पोलिसांनी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले. 

समद खान यांची किराडपुऱ्यात एक तीनमजली इमारत आहे. यातील महिला मजला हॉटेलसाठी तर वरचे दोन मजले कुटुंबीयांना भाडेतत्त्वावर दिले आहेत. भाच्याची लग्नपत्रिका वाटण्यासाठी आणि भाडे वसूल करण्यासाठी समद शनिवारी त्या ठिकाणी आले होते. भाडेकरूंना भेटले असता अनेकांनी या अल्पवयीन गुन्हेगाराची तक्रार केली. इमारतीजवळील जाण्या-येण्याच्या रस्त्यावर हा अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत बसला होता. त्या वेळी भाडेकरूंना त्रास का देतो असे म्हणून समद यांनी त्या गुंडाच्या कानशिलात लगावली. याचा राग आल्याने तो जवळच असलेल्या टेलरच्या दुकानात पळत गेला आणि तिथून धारदार कात्री घेऊन आला. त्याने समद यांच्या डाव्या आणि उजव्या बरगडीत आणि पोटात कात्रीने भोसकून पळ काढला. 


रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समद यांना तत्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर, उपनिरीक्षक संदीप शिंदे, हवालदार अय्युब पठाण व जिन्सी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तंत्रशुद्ध तपास करण्यासाठी तत्काळ पुरावे जमा केले. घटनास्थळी आयबाइक आणि आयकार बोलावण्यात आली होती. शिवाय घटनास्थळ तत्काळ सील करण्यात आले होते. 

बघ्यांची गर्दी : घटनेची माहिती मिळताच किराडपुरा भागात रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दंगाकाबू पथकांनादेखील बोलावण्यात आले होते. समद खान यांचा मृतदेह घाटीत आणला असता नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. या ठिकाणीदेखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ गिते, उपनिरीक्षक शशिकांत तायडे, जे. बी जेठर, आर. डी. देशमुख, एम. डी सोनवणे यांनी जमावाची समजूत घालून त्यांना शांत केले. 

 

गुंडावर लूटमारीचे गुन्हे दाखल 
समद यांचा खून करणाऱ्या अल्पवयीन गुंडावर यापूर्वी मारहाण करणे, लुटणे, दादागिरी करणे असे गुन्हे जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. नशा करून तो गुन्हे करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. बायजीपुरा परिसरात राहत असूनदेखील तो कायम किराडपुरा भागात येऊन लोकांना त्रास देत असे. समद यांच्याकडे राहणाऱ्या एका बिहारी मजुराला त्याने आठ दिवसांपूर्वी मारहाण केली होती. मात्र अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नव्हती. समद खान यांचा खून झाल्यानंतर जिन्सी पोलिसांनी त्यांच्या इमारतीजवळील परिसर सील करून तत्काळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. 

 

वडील रिकामटेकडे, भाऊ आहेत गुंड 
अल्पवयीन गुंडाचे वडीलही कामधंदा करीत नाहीत. किराडपुरा भागात त्यांना धर्मेंद्र म्हणून ओळखतात. त्यांना व त्याच्या गुंड भावालाही जिन्सी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्या सख्ख्या भावावरदेखील लूटमारीचे गुन्हे आहेत. 

 

नशेच्या सेवनामुळे गुन्हेगारी 
जिन्सी व शहरातील अनेक भागात लपूनछपून गांजा व नशेच्या गोळ्या विकल्या जातात. याचे व्यसन अनेक अल्पवयीन मुलांना लागले आहे. या नशेपोटी अनेक मुले गुन्हेगारीच्या मार्गावर गेली असून नशेचे पदार्थ मिळवण्यासाठी ते कुठल्याही पातळीला जातात. वृत्तमालिकेच्या माध्यमातून 'दिव्य मराठी'ने वारंवार ही बाब प्रशासनासमोर आणली. त्यानंतर विशेष पथकही नेमण्यात आले. मात्र कारवाई थंड होताच पुन्हा हा गोरखधंदा सुरू होतो, असे येथील नागरिकांनी सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...