आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचशे रुपयांच्या वादातून अल्पवयीनाची हत्या; दोघे पकडले, चौघे पसार; जमाव धडकला ठाण्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील प्रवीणनगरमध्ये शनिवारी (दि. १८) सांयकाळी पाच वाजताच्या सुमारास दोन गटात वाद झाला. यावेळी एका पंधरा वर्षीय मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला. यामध्ये त्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी गाडगेनगर ठाण्यावर धडक दिली होती. दरम्यान, शनिवारी रात्री पोलिसांनी दोघांना पकडले होते.

 

मो. शोएब मो. इस्माईल (१५, रा. जमजमनगर, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणात नीलेश चंद्रशेखर नकाते (२४, रा. महेंद्र कॉलनी) यासह अन्य एका जणाला पोलिसांनी पकडले आहे. मो. शोएब व नीलेश नकाते यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. हा वाद पाचशे रुपयांचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, शनिवारी सकाळीही या दोघांमध्ये वाद झाला होता. दरम्यान, सायंकाळी मो. शोएब याला निलेशच्या एका मित्राचा फोन आल्यामुळे तो त्याच्या चार ते पाच मित्रांसह व्हीएमव्ही महाविद्यालयाची मागील बाजू प्रवीणनगर चौकात आला. त्यावेळी निलेश, निकू व त्यांचे अन्य चार साथीदार त्या ठिकाणी होते. शोएब व नीलेशच्या गटाचा एकमेकांसोबत शाब्दीक वाद झाला. याच दरम्यान एकाने चाकू काढून शोएबवर सपासप वार केले. यामध्ये तीन वार शोएबच्या छातीत लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शोएबच्या खुनाची माहिती नातेवाईक व त्याच्या परिसरातील नागरिकांना मिळताच शेकडो नागरिकांचा जमाव इर्विन रुग्णालयात धडकला. तसेच रात्री ८ वाजताच्या सुमारास हा जमाव गाडगेनगर ठाण्यावर आला. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी जमावाने केली होती. दुसरीकडे पोलिसांनी पाच पथक तयार करून दोन आरोपींना ताब्यात घेतल्याचे पोलिस उपायुक्त निवा जैन व प्रदीप चव्हाण यांनी सांगितले आहे.

 

शहरात फिक्स पॉइंट
पाचशे रुपयांच्या वादातून हा खून झाला. या प्रकरणात आम्ही दोघांना ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. ठाण्यावर जमाव आला होता. शहरात फिक्स पॉइंट लावले असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रदीप चव्हाण, पोलिस उपायुक्त.

 

बातम्या आणखी आहेत...