आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mirabai Ranked Eighth; Olympics Entry Have Been Confirmed, The International Federation Announces Ranking Of The Olympic Qualifiers

मीराबाई क्रमवारीत आठव्या स्थानी; ऑलिम्पिकचा प्रवेश केला निश्चित, आंतरराष्ट्रीय फेडरेशनकडून ऑलिम्पिक क्वालिफायरची क्रमवारी जाहीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : वेटलिफ्टर मीराबाई चानूने आता सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. तिने आगामी टाेकियाे येथील स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला आहे. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या मीराबाईला ऑलिम्पिकचे तिकीट देण्यात आले. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या (आयडब्ल्यूएफ) वतीने गुरुवारी ऑलिम्पिक क्वालिफायरची क्रमवारी जाहीर करण्यात आली. यातूनच मीराबाईला आठव्या स्थानासह ऑलिम्पिक मधील प्रवेशाची संधी मिळाली आहे. ती ४९ किलाे वजन गटाच्या क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे. यातील टाॅप-४ खेळाडूंमध्ये चीनचे तीन आहेत. नियमानुसार एका देशाच्या एकाच खेळाडूला एका वजन गटात सहभागी हाेणे बंधनकारक आहे. अशात मीराबाईला आघाडी घेता आली.

यंदाच्या सत्रातील एप्रिल महिन्यात एशियन चॅम्पियनशिप हाेणार आहे. या स्पर्धेतील सहभागाने मीराबाईचा ऑलिम्पिकचा प्रवेश निश्चित हाेईल, अशी माहिती भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी दिली.

एप्रिल २०२० मध्ये फायनल क्रमवारी जाहीर केली जाईल. यातील टाॅप-८ खेळाडू हे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरतील. यातूनच आता मीराबाईला दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी तिने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत घेतला हाेत. मात्र, यात ती अपयशी ठरली हाेती. आता याच अपयशातून सावरता तिची नजर जपान येथील स्पर्धेत पदकाकडे लागलेली आहे.

ऑलिम्पिकच्या दाेन्ही गटात १४ इव्हेंट, मात्र एका देशाचे ८ खेळाडू सहभागी

टाेकियाे ऑलिम्पिकच्या पुरुषांच्या गटात सात वजन गटांचा समावेश आहे. यात ६१, ६७, ७३, ८१, ९६, १०९ आणि +१०९ किलाे वजन गटाचा समावेश आहे. तसेच महिलांचे सात वजन गट आहेत. यात ४९, ५५, ५९, ६४, ७६, ८७ आणि +८७ चा समावेश आहे. एक देश या दाेन्ही गटात कमीत कमी प्रत्येकी चारच खेळाडू पाठवू शकताे. एका वजन गटात एका देशाचा एकच खेळाडू सहभागी हाेऊ शकेल.
खेळाडूला सहा इव्हेंट सक्तीचे

ऑलिम्पिक पात्रतेसाठी नाेव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०२० च्या दरम्यान एक खेळाडू कमीत कमी सहा इव्हेंटमध्ये सहभागी हाेणे बंधनकारक आहे. याशिवाय यात प्रत्येकी एका सुवर्ण आणि राैप्यपदकाच्या इव्हेंटची गरज आहे. दुखापतीमुळे गत सत्रात मीराबाईने अनेक इव्हेंटमधून माघार घेतली. दुखापतीमुळे तिला २०१८ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही सहभागी हाेता आले नाही.

महिला गटातील टॉप-8

खेळाडू - देश - क्रम. गुण
होउ झीहुई - चीन - 4703.19
जियांग हुईहुआ - चीन 4667.88
सॉन्ग गुम - कोरिया - 4209.49
झांग रॉन्ग - चीन - 3837.82
एलिजाबेथ - अमेरिका - 3195.68
इशा केंटिका - इंडोनेशिया - 3128.44
सीगुरा इरिश - कोलंबिया - 3121.11
मीराबाई चानू - भारत - 2966.64

मल्लेश्वरीच्या नावे एकमेव पदक

भारतीय संघाला ऑलिम्पिकच्या इतिहासात वेटलिफ्टिंगमध्ये आतापर्यंत फक्त एका पदकाची कमाई करता आलेली आहे. २००० मध्ये सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेतील महिलांच्या ६९ किलाे वजन गटात कर्णम मल्लेश्वरीने कांस्यपदकाची कमाई केली हाेती. यासह तिने भारताला या खेळ प्रकारात ऑलिम्पिकचे पदक मिळवून दिले. आता मीराबाईकडून आशा आहे.