भाजपच आपला नंबर / भाजपच आपला नंबर एकचा शत्रू; स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा : मिर्लेकर

Feb 01,2019 10:37:00 AM IST


नाशिक : २५ वर्षांपासून मित्र पक्ष असलेल्या भाजपने आपल्या भरवश्यावर राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी त्यांनी चार वर्षांच्या काळात वेळाेवेळी सापत्न वागणूक दिल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे आजमितीला भाजपच आपला एक नंबरचा शत्रू असून त्या दृष्टीने तुम्ही कामाला लागा, असा सल्ला शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. मात्र, हा सल्ला देतानाच त्यांनी शेवटी पक्षप्रमुख हिंदुत्वाच्या मुद्यावर जाे निर्णय घेतील, ताे आपल्याला शिरसावंद्यच मानावा लागेल, अशी पुष्टीही जाेडल्यामुळे नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत शिवसेना पदाधिकारी चांगलेच बुचकळ्यात पडले.


चार विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, आमदार योगेश घोलप, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित हाेते. मिर्लेकर यांनी गेल्या तीन दिवसांपासून सर्व विधानसभानिहाय पक्षीय कामकाजाचा आढावा घेतला. ते म्हणाले, शिवसैनिकांचा उत्साह व बूथप्रमुखांचे कामकाज बघता आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यात भगवा फडकविण्यास शिवसेना पूर्ण ताकदीनिशी सज्ज झाली आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांनी गटप्रमुख, शाखाप्रमुखांना सक्रीय करून तळागाळातील शिवसैनिकांना व नागरिकांना विश्वासात घ्यावे असे आवाहन केले. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या असल्याचे सांगत युती हाेवाे अथवा न हाेवाे, तयारी ठेवली पाहिजे, असे सांगितले. जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चाैधरी यांनीही निवडणुकांच्या तयारीसाठी कामाला लागावे, असे सांगितले. बिबट्याच्या हल्ल्यातून बचावलेले नगरसेवक संताेष गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. निलेश चव्हाण, मिलिंद घनकुटकर, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, उपजिल्हाप्रमुख जगनराव आगळे, युवासेना जिल्हाध्यक्ष दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, योगेश बेलदार, अॅड. श्यामल दीक्षित, मंदा दातीर, वैशाली राठोड आदींसह उपतालुकाप्रमुख, सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

X