आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाचे उलटचक्र : खिन्न चेहरे अन् सुन्न मने, माणदेशाचे हेच जिणे, ‘कृषिसंपन्न’ जिल्ह्यांमध्येही शेतकऱ्यांचे हाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा/सांगली| -‘साऱ्या जिमिनीचं बघा कसं वाळवंट झालंय... या ढेकळांत तसं बी ज्वारीशिवाय फार काई व्हतं न्हाई... गेल्या टायमाला तर पाऊसच न्हाई आन् गवताची काडी बी उगवली न्हाई... पीक-पान्याचं सोडाच.... अवो हितं अंघोळीचा चार-चार दिसं खोळंबा व्हतो... येवडंच काय कुनी प्याला पानी मागितलं आन् त्यातून चूळ भरली तरी पानी वाया का घालवलं म्हनून भांडन सुरू व्हतं... मानसालाच प्याला पानी न्हाई तर जनावराचं काय करायचं... सारी जनावरं धाडलीत छावनीत आन् मानसं बी आता तितंच जात्याती मुक्कामी...’ अस्सल माणदेशी टोनमध्ये शहाजी बुधावरे परिसरातल्या सद्य:स्थितीचं वर्णन करत होते आणि त्याची प्रचिती या भागात फिरताना जागोजागी येत होती. खरे तर कृषिसंपन्न म्हणून सातारा आणि सांगली जिल्ह्यांची ओळख. पण याच जिल्ह्यांच्या पूर्व भागातली पाण्याची स्थिती ‘टंचाई’ हा शब्दही थिटा पडावा अशी आहे. परिणामी ‘खिन्न चेहरे अन् सुन्न मने ’ असाच उदासवाणा माहौल सर्वत्र पाहावयास मिळतो. 


सांगली शहरातून जत-आटपाडीकडे प्रवास सुरू केला की सुरुवातीला रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी हिरवीकंच उसाची राने पाहून आपण नेमके दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहोत की समृद्ध शेतीची पाहणी करण्यासाठी आलो आहोत असा प्रश्न पडताे.


काही अंतर पार केल्यावर तासगाव परिसरातले द्राक्षमळे नजरेत भरतात आणि पाठोपाठ डोंगर उतारांवर फिरणाऱ्या शेकडो पवनचक्क्या लक्ष वेधून घेतात. या डोंगररांगा उतरून खाली आल्यावर मात्र उजाड-ओसाड जमिनीचे पट्टे पाहून दुष्काळाची चाहूल लागते आणि जसजसे पुढे जावे तसतशी दुष्काळाची छाया अधिकाधिक गडद होत जाते. जत तालुक्यात प्रवेश करताच सर्वत्र रखरखाट दिसू लागतो. खानापूर-आटपाडीमध्येही फार काही वेगळी स्थिती नाही आणि लगतच्या संपूर्ण माणदेशला तर दुष्काळाचा दाह अक्षरश: भरडून काढत असल्यासारखी स्थिती आहे. 
या भागात नजर जाईल तिकडे फक्त शुष्क पडलेली अन् रापलेली ओसाड-उजाड जमीन दिसते. बहुतांश नद्या-नाल्यांच्या पात्रांना गेल्या हंगामात पाणीच आलेले नाही. अपवाद वगळता यच्चयावत विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी सरासीपेक्षा किती तरी खोल गेली असल्याने हातपंपही निरुपयोगी ठरतात. अशा स्थितीत पिण्यापुरत्या एक-दोन घागरी पाणी मिळवण्यासाठी तीन-चार किलोमीटरची पायपीट करावी लागते अथवा टँकरच्या फेरीकडे डोळे लावून बसावे लागते. पिण्याच्या पाण्याची ही स्थिती असल्याने पिकाला पाणी वगैरे देणे संभवतच नाही. इथला शेतकरीही जनावरांना पोटच्या पोराप्रमाणे जीव लावतो, पण माणसालाच जेमतेम पिण्यापुरते पाणी मिळण्याची मारामार असताना जनावरांना पाणी आणि चारा आणायचा कुठून असा प्रश्न छळत राहतो. शेवटी मजबुरीने त्याला परिसरातील चारा छावणीत आपली जनावरे पाठवावी लागतात. चारा छावण्या सुरू तर झाल्या आहेत, पण अपवाद वगळता तिथली स्थितीही समाधानकारक नाही. ज्या संस्था चारा छावण्या चालवतात त्यांना शासन जेवढे अनुदान प्रत्येक जनावरापोटी देते त्याहून प्रत्यक्षात अधिक खर्च लागत असल्याचे छावणीचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जनावरांना चारा, पेंड देण्यात कपात करावी लागते. त्याचा परिणाम जनावरे रोडावण्यात होत असल्याचे स्थानिक शेतकरी सांगतात. गाई-बैलांना किमान छावण्यांमध्ये तरी जागा आहे, त्यांच्यासोबत आता शेतकरी कुटुंबांनाही तिथेच आसरा घ्यायची वेळ आली आहे. पण शेळ्या-मेढ्यांना तर ना छावणीचा आसरा, ना चारा-पाणी अशी स्थिती आहे. त्यामुळे या शेळ्या-मेढ्यांचं करायचं काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे. 

 

राेजगार नाही, स्थलांतराची वेळ
या भागात रोजगाराची समस्याही भीषण आहे. पीक नाही, त्याचा मोठा परिणाम या भागातील रोजगारावर झाला आहे. लोकांकडे उत्पन्नाचे साधनच नसल्याने मजबुरीने स्थलांतर करावे लागत असल्याने स्थानिक पातळीवरचे लहान-सहान व्यवसायही ठप्प होत आहेत. विशेषत: तरुण पोरे मजुरी वा मिळेल ते काम करण्यासाठी जवळपासच्या शहरांची वाट धरत असल्याने अनेक गावांत वृद्ध व स्त्रियांची संख्याच जास्त प्रमाणात दिसते. शासनाची कर्जमाफी वा अनुदान वगैरे योजनांचा इथे काहीच लाभ झाला नसल्याचे सगळे शेतकरी एका सुरात सांगतात. यापुढेही पाण्याची स्थिती अशीच राहिली तर पुढच्या पिढीला स्थलांतराशिवाय पर्याय उरणार नाही. --