आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या गाडीत बसल्याने...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा इंटरसिटीने (कुर्डुवाडीहून) पुण्याला जाण्यासाठी निघाले. सकाळी साडेसातची वेळ असावी. कुर्डुवाडी स्टेशनवर पोहोचले. पुण्याला माझ्या मामांना भेटण्यासाठी निघाले. ते दवाखान्यात अ‍ॅडमिट होते. तितक्यात एक गाडी प्लॅटफॉर्मवर लागली. मला वाटले इंटरसिटीच आहे. त्या गाडीत बसले. तर गाडीचा रिकामा डबा पाहून थोडेसे आश्चर्यही वाटले. इंटरसिटीच आहे का, याची चौकशी करावी म्हणून खाली एक-दोघांना विचारले असता, त्यांनी होकारार्थी मान डोलावली. तो गार्डचा डबा होता, ते गार्ड मला सतत कोठे जायचे म्हणून विचारत होते. मी त्यांना काहीच बोलले नाही. गाडीतील मोकळी सीट पाहून मी झोपीही गेले. काही वेळाने गाडी थांबली म्हणून मला जाग आली, पाहते तर गाडी सोलापूरच्याही पुढे अक्कलकोट रोडला चालली होती. तितक्यात टीसी आला. त्यांनी माझ्या तिकिटाबद्दल विचारले. माझे पुण्याचे तिकीट त्यांना दाखवले. तर त्यांनी ही गाडी चेन्नईला चालली असल्याचे सांगितले. मला गरगरायला लागले.

तितक्यात जिथे गाडी थांबली होती तेथे क्रॉसिंगमुळे पुण्याला जाणारी गाडीही थांबली होती. त्यांनी मला त्या गाडीत बसण्यास सांगितले. गाडी सुटली खरी... पण ज्या डब्यात बसले, तो फर्स्ट क्लासचा डबा होता. तेथील प्रवाशांनी बसायला जागा दिली, पण धाकधूक चालूच होती. पुण्यात दुपारी चारपर्यंत पोहोचले. सकाळी 7.30 पासून 4 पर्यंत उलटसुलट दिशेने प्रवास चालू होता. सुशिक्षित असूनही गाडीवर लिहिलेली नावे वाचण्याची तसदीही मी घेतली नाही. त्यामुळे फजिती होत होती. जर त्या गाडीत टीसी आलाच नसता तर? मी झोपेत चेन्नईला पोहोचले असते. टीसी मला देवासारखाच भेटला. त्याने कोणताही दंड न आकारता, मला योग्य त्या गाडीत बसण्याचा सल्ला दिला.