आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गफलतीचा कळस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझी आई आणि मावशी यांच्या दिसण्यामध्ये खूपच साम्य आहे. माझ्या आईला चार वर्षांपूर्वी देवाज्ञा झाली. हल्ली जेव्हा आम्ही मावशीला भेटतो, तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. तिने आता वयाची पंचाहत्तरी ओलांडली आहे, परंतु पूर्वी उमेदीत त्या दोघी बहिणींनी सुमारे तीन तपे श्री क्षेत्र गाणगापूरची वारी केली. गाणगापूर येथे माघी पौर्णिमेच्या उत्सवासाठी त्यांची न चुकता नियमित हजेरी असे. शरीराने साथ दिली तोवर हा उपक्रम त्यांनी अखंड सुरू ठेवला. त्या दोघींनी मनोभावे आपली सेवा रुजू केली. आम्ही भावंडे त्यांच्याबरोबर कधीतरी जात असू.

गाणगापुरातील आश्रमात अनेक गुरुबंधू भगिनींचा मेळा जमत असे. जवळपास वर्षभराने भेटणारे सर्वजण एकमेकांची जातीने चौकशी करीत. त्यातील एक गृहस्थ आमची चौकशी करताना हमखास गोंधळून जात. इंदुताई कोण आणि सिंधुताई कोण हे जरी त्यांना ठाऊक होते तरी अधूनमधून येणा-या आम्हा मुलांची त्यांना अजून नीटशी ओळख झालेली नव्हती. त्या दिवशी मात्र सखोल विचारपूस करून त्यांनी आमचा परिचय करून घेतला. आता मात्र चंद्रकांत आणि गिरीश या दोहोंमध्ये ते गफलत करणार नाहीत, अशी खात्रीलायक ग्वाही देऊन आवर्जून सांगितले. योगायोगाने सलग दुस-या वर्षीही आमचे तिकडे जाणे झाले. मागील वर्षी घडलेल्या ओळख परेडविषयक चर्चेचा आम्हाला विसरही पडला होता. इतक्यात ते सद्गृहस्थ आमच्या पुढ्यात दत्त म्हणून स्वागतालाच हजर होते. आमचे आगमन होताच मला ते म्हणाले ‘अरे वा ! चंद्रकांत तू कसा आहेस?’ मी लगेच म्हणालो ‘अहो, मी चंद्रकांत नाही, मी गिरीश !’ ते इथेच थांबले नाहीत, ‘अरेच्चा, म्हणजे तू सिंधुताईंचा ना?’ असे म्हणत त्यांनी पुन्हा पूर्वीचाच गोंधळ उडवून दिला. गफलतीचा फुगा फोडताना मी शांतपणे उत्तरलो,‘ नाही, मी
इंदुताईंचा ’ पुढे ‘अच्छा , म्हणजे तुम्ही देशमुखच ना?’ असे काही ते विचारायच्या आत मी तिथून काढता पाय घेतला.