आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाहीर कार्यक्रमात आमदार बबनराव लोणीकर महिला तहसीलदारांना म्हणाले ‘हिरोइन’

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • परतूर तालुक्यातील काऱ्हाळा येथील घटना, वक्तव्याची ध्वनिफीत व्हायरल

आशिष गारकर 

परतूर- तालुक्यातील काऱ्हाळा येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात भाषण करताना माजी मंत्री तथा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी पुन्हा बेताल वक्तव्य केले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिला तहसीलदार रूपा चित्रक यांचा त्यांनी ‘हिरोइन’ असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याची ध्वनिफीत समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे. 


मागील वर्षी मार्च महिन्यात तालुक्यातील रंगोपंत टाकळी येथील कार्यक्रमात आपल्या भाषणादरम्यान गावातील एका ग्रामस्थाला दम भरल्याची ध्वनिफीत व्हायरल झाली होती.  परतूर तालुक्यातील काऱ्हाळा येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा शनिवार, १ फेब्रुवारी रोजी आमदार लोणीकर यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. 

दुपारी बारा वाजेच्या सुमारास लोकार्पण सोहळा आटोपल्यानंतर ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांना संबोधित करताना लोणीकर बोलत होते. मराठवाड्यातील सगळ्यात मोठा मोर्चा आपल्याला करायचा आहे, असे कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत असताना त्यांची जीभ घसरली. 

काय म्हणाले लोणीकर :
 
‘हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचा का तुम्ही ठरवा. सगळ्या सरपंचांनी आपापल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सगळ्यांनी ताकद जर लावली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा होऊ शकतो आणि अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला तर पंचवीस हजार लोक आले, पन्नास हजार लोक आले... तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीसला आणा, तुम्ही सांगा चंद्रकांत दादा पाटलाला आणा, तुम्ही सांगा सुधीरभाऊला आणा, तुम्ही सांगा कोणाला आणायचं. तुम्हाला वाटलं तर सांगा नाही तर मग एखादी हिरोनी आणायची तर हिरोनी आणा आणि नाही कोणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोइन आहेच. त्या निवेदन घ्यायला येतील तुमचं.’

भ्रमणध्वनीस प्रतिसाद नाही
 
दरम्यान, व्हायरल झालेल्या वक्तव्याबाबत आमदार लोणीकर यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी तीन-चार वेळा भ्रमणध्वनीवर संपर्क केला. परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.