आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकार फक्त घोषणा करण्यात पटाईत- आमदार बाळासाहेब थोरात, काँग्रेसच्या महापर्दाफाश सभांचा अमरावतीतून शुभारंभ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- राज्य सरकारची एकही घोषणा अद्याप पूर्णपणे अंमलात आली नाही आणि जनतेला दिलासा मिळाला नाही. भाजप शिवसेना सरकार फक्त घोषणा करण्यात पटाईत आहे. असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहोब थोरात यांनी केला. ते अमरावती येथे महापर्दाफाश सभेला मार्गदर्शन करताना बोलत होते.
 
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची पोलखोल करण्यासाठी काँग्रेस पक्षाने महापर्दाफाश सभांचे आयोजन केले आहे. आज अमरावती येथे पहिली पर्दाफाश सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर, प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, आ. यशोमती ठाकूर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आशिष दुआ, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, आ. विरेंद्र जगताप, आ. वजाहत मिर्झा, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बब्लू देशमुख, अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, माजी आ. केलराम काळे, आशिष देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, प्रदेश काँग्रेसचे सचिव व अमरावती जिल्हा प्रभारी प्रकाश देवतळे, रविंद्र दरेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. थोरात म्हणाले की, राज्य सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. या सरकारची कर्जमाफी फेल झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे हप्ते भरून घेतले पण नुकसान भरपाई मिळाली नाही. पीक विम्याची मदत अद्यापही मिळाली नाही. विमा कंपन्या तुपाशी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती आहे. शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. शिवसेनेला शेतकऱ्यांची एवढीच काळजी होती तर त्यांना रस्त्यावर उतरून बनवाबनवी करण्यापेक्षा विधानसभेत का मांडला नाही असा प्रश्न आ. थोरात यांनी उपस्थित केला. 
 
धर्मा पाटील यांच्यासारख्या शेतकऱ्यांना न्यायासाठी मंत्रालयात आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव आहे. जलयुक्त शिवार भ्रष्टाचारयुक्त शिवार झाला आहे. अद्यापही राज्यात टँकर सुरु आहे. पूरग्रस्त भागातील ब्रम्हनाळ येथे बोट उलटून सतरा जीव गेले, त्यावेळी मंत्री जल्लोष करत होते. सरकारमध्ये संवेदनशीलता राहिली नाही. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार भांडवलशाही धार्जिणे आहे. बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. हे सरकार पुढील काळात सत्तेत राहिले तर खूप मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून सरकार दिशाभूल करत आहे. सरकारच्या या खोटेपणाची पोलखोल या महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून काँग्रेस करेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
 
या सभेला मार्गदर्शन करताना प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांनी सरकारवर चौफेर टीका केली, ते म्हणाले की, भाजप शिवसेना सरकारच्या काळात गुन्हेगारांना क्लीन चीट दिली जात आहे. जनतेच्या पैशांवर डल्ला मारणारे मोकाट आहेत. घोटाळेबाजांना सरकारचे संरक्षण आहे. कामगारांना दिल्या जाणा-या साहित्यामध्ये, आदिवासी योजनांमध्ये, शिक्षण विभागाच्या खरेदीमध्ये राज्य सरकारच्या बहुतांश विभागामध्ये फक्त घोटाळेच सुरु आहेत. या घोटाळेबाज मंत्र्यांना सरकारचे संरक्षण आहे. पीक विमा कंपन्यांनी सरकारच्या मदतीने शेतक-यांचे हजारो कोटी लूटले. काँग्रेस सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत होती. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था घसरत चालली आहे. राज्याचा गाढा रूळावर आणण्यासाठी हे सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणावे लागेल असे पटोले म्हणाले. उद्या मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी भंडारा, तुमसर आणि गोंदिया येथे महापर्दाफाश सभा होणार आहेत.