आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी जिल्हा कचेरीत पार पडली. यावेळी हा हंगामा दिसून आला. सकल मराठा समाजातर्फे अकोट येथे नुकत्याच झालेल्या आंदोलनात पोलिसांनी ७०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही बाब विपर्यास्त आणि हेतुपुरस्सर असल्याचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांचे म्हणणे होते. तर गेल्या बैठकीत ठराव होऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यावर कारवाईची मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे पाठवला नाही, असा आमदार सावरकर यांचा मुद्दा होता. या दोन्ही मुद्द्यांबाबत दोन्ही अधिकाऱ्यांनी केलेला युक्तिवाद पटण्याजोगा नाही, असा आमदारद्वयांचा घोषा होता.
राज्य महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास अडवून ठेवली गेली. हा मुद्दा राज्याच्या पोलिस महासंचालकांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे मलाही उत्तर देणे भाग होते. या प्रकारामुळेच अकोटात गुन्हे दाखल करावे लागले, असा खुलासा पोलिस अधीक्षकांनी केला. परंतु आंदोलनात केवळ दीडशे नागरिक असताना ७०० लोकांवर गुन्हा दाखल केलाच कसा, असा भारसाकळे यांचा मूळ प्रश्न होता.
दोन अधिकाऱ्यांना मौखिक आदेश देऊन तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बाळापूर तालुक्यातील एक रस्ता आणि मूर्तिजापूर येथील आवास योजनेच्या कंत्राटदाराचे वेतन करविले, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गेल्या बैठकीतच विस्तृत चर्चा होऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे ठरले होते. अध्यक्षांनी तसे 'रुलिंग'ही दिले होते. त्याचा उल्लेख अनुपालनात असतानाही प्रत्यक्षात हा ठराव का गेला नाही, असा सावरकर यांचा सवाल होता. समितीचे सचिव या नात्याने कलेक्टर यासाठी जबाबदार असल्याचे त्यांनी प्रतिबिंबित केले.
अकोटच्या घटनेचे चौकशीचे आदेश
अकोट येथील कारवाई सूडबुद्धीने किंवा जाणीवपूर्वक झाली आहे का, याची चौकशी करुन १५ दिवसांच्या आत अहवाल मागवण्यात आला आहे. एसपींनी स्वत: लक्ष घालून या प्रकरणाची चौकशी करावी आणि या प्रकरणात ज्यांना नाहक गोवण्यात आले, त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याचा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे पाठवण्यात यावा, असा आदेश पीठासीन सभापती डॉ. रणजित पाटील यांनी दिला आहे.
भाजपवाल्यांचा सभात्याग
आमदार भारसाकळे यांच्या मुद्द्यावर पीठासीन सभापतींनी योग्य निर्णय दिला नाही, असे या सर्वांचे म्हणणे होते. त्यामुळे महापौर विजय अग्रवाल, खासदार संजय धोत्रे, अकोल्याचे दोन्ही आमदार रणधीर सावरकर , गोवर्धन शर्मा आणि काही सदस्यांनी सभात्याग केला. या बाबीला महापौरांनी दुजोरा दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.