Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | MLA for three month from Katol

काटोल पोटनिवडणुकीत पक्षांनी उमेदवारच उभे करू नयेत : पवार

प्रतिनिधी | Update - Mar 17, 2019, 12:43 PM IST

फक्त ३ महिन्यांसाठी विधानसभा निवडणूकीचा अट्टाहास नको

  • MLA for three month from Katol

    नागपूर- काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारास केवळ तीनच महिने आमदारकी मिळणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीचा खटाटोप कशाला करावा, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.


    राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाकडे काटोलची पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी करावी अथवा कुणीही उमेदवारी अर्जच दाखल करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने अर्ज दाखल करावा, त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा. यामुळे प्रशासनाला होणारा त्रासही वाचेल, असेही शरद पवार यांनी सुचवले. माजी आमदार आशिष देशमुख यांनी भाजप तसेच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त काटोल विधानसभेची पोटनिवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत घेतली जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यातच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवारास जून, जुलै, ऑगस्ट असा तीनच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत निवडणूक घेण्याची गरज नव्हती, असे पवार मुंबईत बोलताना म्हणाले.

    निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने आता काही करता येणार नाही. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक रद्द करण्याची मागणी करावी. आयोग आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करू नये, असे मत पवार यांनी व्यक्त केले. दरम्यान, वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवार यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. केंद्रातील मोदी सरकारने विविध मुद्यांआधारे वेठीस धरून जनतेच्या मनातील आपली विश्वासाहर्ता गमावली, असे ते म्हणाले.

Trending