आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांना निधीतून दुष्काळाची २५ लाखांची कामे करता येणार;अंमलबजावणीला सुरुवात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्यात पडलेल्या तीव्र दुष्काळात तत्काळ पाणीपुरवठा व्हावा, त्यासाठी अावश्यक बाबींची तत्काळ उपलब्धता करता यावी यासाठी राज्य शासनाने अाता अामदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यात २५ लाखांपर्यंतची कामे करण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 
य‌ंदाच्या तीव्र दुष्काळात पिण्याच्या पाण्याची मागणी होताच तत्काळ पुरवठा करण्याचे आदेश पूर्वीच शासनाकडून जारी करण्यात आलेले आहेत.  परंतु प्रशासनाकडून परवानगी मिळवण्यात अनेकदा विलंब होतो. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे शासनाचीही प्रतिमा मलिन होते. त्यामुळेच तत्काळ पाणीपुरवठ्याच्या योजना करण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. टँकर मंजुरीचे अधिकारही आता स्थानिक प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. परंतु वाढता दुष्काळ लक्षात घेता राज्य शासनाने आता आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याचा निर्णय २२ मे २०१९ रोजी घेतला आहे. त्यात घेतलेल्या निर्णयातील बहुतांशी उपाययोजना टंचाई निधीतून यापूर्वीच सुरू करण्यात आलेल्या आहेत.  

 

या कामांसाठी निधी वापर
टंचाई निवारणाच्या योजनेंतर्गत आमदारांना तात्पुरती पाणी साठवण व्यवस्था करण्यासाठी टाकी बांधणे, प्लास्टिक साठवण टाकी बसवणे, छावणीतील जनावरांना खाद्य बकेट-टब्ज देणे, गोशाळा शेड उभारणे तसेच पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक साहित्य पुरवठा करणे या स्वरूपाच्या उपाययोजना आमदार निधीमधून २५ लाखांच्या कमाल मर्यादेपर्यंत करता येतील. 

अंमलबजावणीला सुरुवात
आमदार टंचाई निवारणार्थ योजनेची अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्यात आली आहे. टंचाईग्रस्त भागात आता सुविधाही आमदारांच्या निधीतून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील आदेशही सर्वच प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार, कामकाज करण्यासाठी अंमलबजावणी सुरू केली आहे. 
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक