सत्तेसाठी काय पण.. / पंधरा दिवसांत तीनदा पक्ष बदलणाऱ्या आमदारामुळे रूढ झाला आयाराम-गयाराम शब्द

वाढती पक्षांतरे, वारंवार बदलणाऱ्या निष्ठा डोकेदुखी होऊन बसल्याने १९८५ मध्ये पक्षांतरविरोधी कायद्याची मुहूर्तमेढ रोवली

दिव्य मराठी

Sep 22,2019 10:33:51 AM IST

रमाकांत दाणी

नागपूर - प्रवाहासोबत जाऊन केवळ संधी शोधायची, या भूमिकेतूनच नेत्यांनी कोलांटउड्या मारत पक्ष बदलल्याची असंख्य उदाहरणे महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहेत. दलबदलू नेत्यांसाठी ‘आयाराम-गयाराम’ शब्दप्रयाेग केला जाताे. मात्र, या शब्दप्रयाेगाच्या उगमाचा हरियाणातील गमतीशीर किस्सा आहे. त्याचे नायक होते १५ पंधरा दिवसांत तीनदा पक्ष बदलणारे तत्कालीन आमदार गयालाल. ते हसनपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मूळचे काँग्रेसी गयालाल यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. काँग्रेसच्या उमेदवारास पराभूत करून ते विजयीही झाले. तथापि, निवडणुकीत बहुमत मिळालेली काँग्रेस भागवत दयाल यांच्या नेतृत्वात सत्तारूढ झाली. मात्र, बंडखोरी झाली अन‌् बंडखोरांनी हरियाणा काँग्रेस नावाने नवा पक्ष स्थापला. विजयी अपक्ष व अन्य पक्षांच्या मदतीने बहुमताची जुळवाजुळव करून स्थापन झालेल्या युनायटेड फ्रंटचे सरकार राव बिरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात सत्तारूढ झाले. त्यानंतरही आमदारांचे दलबदल हा हरियाणाच्या राजकारणातील नित्याचाच क्रम झाला. परिणामी राव बिरेंद्र सिंह यांचे सरकार काही महिन्यांतच अस्थिर झाले. विधानसभा बरखास्ती होऊन राष्ट्रपती राजवट लागू झाली. या घटनाक्रमात अपक्ष आमदार गयालाल सुरुवातीला युनायटेड फ्रंटच्या गोटात दाखल झाले होते. त्याच वेळी काँग्रेसने त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले. आमदार गयालाल यांनी मुख्यमंत्रिपदासाठी भागवत दयाल यांच्या नावाला तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे काँग्रेसने चौधरी चांद राम यांना मुख्यमंत्री केले जाईल, असे सांगत त्यांना पक्षात आणले. मात्र, काही तासांतच काँग्रेसने नेते म्हणून भागवत दयाल यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे संतापलेले गयालाल यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि ते पुन्हा युनायटेड फ्रंटवासी झाले. राव बिरेंद्र सिंह यांनी चंदिगडमध्ये पत्रकारांपुढे गयालाल यांच्या पक्षबदलाची घोषणा करताना ‘गया राम अब आया राम हाे गए’ असा वाक्प्रचार वापरल्याचे सांगितले जाते. या घटनेला पाच दशके उलटून गेली तरी हरियाणातील हा राजकीय घटनाक्रम देशभरात अजूनही लाेकप्रिय आहे.


१९८५ मध्ये कायदा
माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाणांनी संसदेत एका पक्षबदलाच्या घटनाक्रमाचे वर्णन करताना ‘आयाराम गयाराम’ हा वाक्यप्रयाेग वापरला व नंतर ताे सर्वत्र रूढ झाला. वाढती पक्षांतरे, वारंवार बदलणाऱ्या निष्ठा डोकेदुखी होऊन बसल्याने १९८५ मध्ये पक्षांतरविरोधी कायद्याची मुहूर्तमेढ रोवली.


X
COMMENT