आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
धुळे- आमदार झालोच पाहिजे, अशी काही माझी धारणा नाही. पण तुमचा हिशेब चुकता करण्यासाठी जामनेरला यावे लागले तरी हरकत नाही, असे खुले आव्हान आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. मंत्री गुलाबराव पाटलांनी 'गादीवरच्या कुस्त्यांसाठी लंगोट घालणारे महाजन तुम्ही आहात' या शब्दांत हिणवले. ही कमरेखालची टीका नाही का, असा प्रश्नही गोटे यांनी केला.
आमदार अनिल गोटे यांनी मंगळवारी पुन्हा पत्रक काढले. त्यात गोटे यांनी म्हटले आहे की, मोगलांना संताजी-धनाजी दिसायचे. तसे मंत्री महाजनांना केवळ अनिल गोटे दिसतात. वारंवार बारामतीचा उच्चार करून महाजनांनी बारामती आपली 'दुखती नस' असल्याचे कबूल केले आहे. मात्र, बारामतीत जाऊन पराभव करण्याची त्यांची राणा भीमदेवी छाप घोषणा कुणीही मनावर घेतलेली नाही. सत्तेत असतानाही जलसंपदा विभागात घोटाळा केला म्हणून महाजनांकडून अजित पवारांवर कारवाई झालेली नाही. महाजन म्हणतात मला राज्यातून निमंत्रणे येत आहेत. मात्र, त्यांना धुळ्यातही कोणी जेवणाचे निमंत्रण देत नाही. महाजन म्हणाले की धुळ्यात अनिल गोटेंची एकही सीट येऊ द्यायची नव्हती. याचाच अर्थ त्यांनीच मतदान यंत्रात हेराफेरी करून राष्ट्रवादीतून आलेल्या गुंडांची टोळी निवडून आणण्याचे काम केले, असा आरोपही केला.
आमदारकीचे कौतुक नाही
मी धुळ्यातून लढलो नाही तरी चालेल. माझे काही नुकसान होणार नाही. पण तुमच्या मतदारसंघात येऊन ठाण मांडून बसलो तर... तुमचे कसे होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. आता यावर मंत्री महाजन गोटेंबाबत काय उत्तर देतात हे पाहणे सर्वांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.