political / कॉर्पोरेट अधिकाऱ्यालाही आमदार भारी; भत्त्यांसह दरमहा वेतन २ लाखांवर

लेखाजाेखा सहाव्या वेतन आयाेगानुसार सध्या विधानसभा-विधान परिषद सदस्यांना मिळते वेतन-भत्ते, सातवा वेतन आयाेग लागू झाल्यास आणखी भरघाेस वाढ हाेण्याची शक्यता

महेश जोशी

Sep 11,2019 08:45:00 AM IST

औरंगाबाद : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रातील आमदारांचे दरमहा वेतन व भत्ते प्रशासकीय उच्चपदस्थ अधिकारी व कॉर्पाेरेट‌्स‌नाही मागे टाकणारे आहेत. वेतन, महागाई भत्ता, फोन बिल, टपाल अशा विविध बाबींसाठी एका आमदाराला महिन्याकाठी १ लाख ८३ हजार ४४० रुपये मिळतात. स्वीय सहायकासाठी २५ हजार रुपयांची तरतूद आहे. वर्षभरात राज्यात ३२ तर राज्याबाहेर ८ वेळा विमान प्रवासाचीही सोय आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर यात मोठी वाढ होणार आहे. २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये आमदारांच्या वेतन आणि सोयीसुविधांमध्ये जम्बो वाढ झाली.


समाजसेवेसाठी राजकारणात आलेल्या मंडळींचे आमदार होणे हे स्वप्न असते. महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचे वेतन व भत्ते अधिनियम, १९५६ नुसार आजी-माजी आमदारांचे वेतन व इतर भत्ते निश्चित केले जातात. यात वेळोवेळी सुधारणाही आमदारच बहुमताने करून घेतात. सध्या आमदारांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळते. २४ ऑगस्ट २०१६ पासून जुन्या वेतनात सुधारणा झाली. त्यानुसार आमदार ५ वर्षांत मालामाल होतात.


प्रवासाच्या सुविधा : ३२ वेळा राज्यात विमानाने मोफत प्रवास
एका आर्थिक वर्षात विमानाने राज्यात कोठेही ३२ वेळा तर देशात ८ वेळा मोफत प्रवास. राज्यात रेल्वेने फर्स्ट क्लास, टू-टियर किंवा थ्री टियरने प्रवासासाठी १५,००० रुपयांचे कुपन. रेल्वेने पत्नी, मुले किंवा अन्य सोबतीसोबत राज्यात किंवा राज्याबाहेर प्रवासासाठी १५,००० रुपयांचे कुपन. वर्षाला ३० हजार किमी प्रवासाची परवानगी. एसटी महामंडळ, एमटीडीसी किंवा बेस्ट बसने आमदार, पत्नी, मुले किंवा अन्य सोबतीसोबत राज्यात कोठेही मोफत प्रवास.


2009 : 44 हजार वेतन | 2014 : 2 लाख 8,440 रु.
मूळ वेतन 67000
दूरध्वनी भत्ता 8000
स्वीय सहायक 25000
डीटीपी ऑपरेटर 10000
स्टेशनरी, टपाल 10000
२००९ मध्ये लाभ असे
महागाई भत्ता 88440
(बेसिकच्या 132%)
मूळ वेतन : २,००० इतर भत्ते : १,५०० दूरध्वनी भत्ता : ८,०००
टपाल : १०,००० वाहन भत्ता : २५,००० एकूण : ४४,०००


वैद्यकीय लाभ असे : शासकीय रुग्णालयात मोफत उपचार
आमदार, त्याची पत्नी, मुले, आई-वडील यांना शासकीय रुग्णालयात विनामूल्य उपचारांची सुविधा मिळते. महिला आमदारांचे आई-वडील, भाऊ, घटस्फोटित बहिण, सासू-सासरे यांनाही विनामूल्य उपचाराची सुविधा. आकस्मिक प्रसंगी शासनमान्य खासगी रुग्णालयातील उपचाराचे ८० टक्के आणि औषधीचे १०० टक्के बिल सरकारकडून भरले जाते. मात्र खासगी रुग्णालयातील उपचाराची बिले देण्याची परवानगी नाही.


इतर लाभ : वर्षाला २ कोटींचा स्थानिक विकास निधी उपलब्ध
आमदारांना वर्षाला नियोजन विभागाकडून दोन कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी उपलब्ध करून दिला जातो. विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात दररोज सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आमदारांना प्रत्येकी २००० रुपये मिळतात. आमदाराच्या निवासस्थानी लँँडलाइन फोनचे डिपॉझिट आणि मासिक बिल सरकारकडून भरले जाते. आमदारांना लॅपटॉप किंवा डेस्कटॉप, लेझर प्रिंटर पुरवण्यात येतो. आमदाराला एका टर्ममध्येे १० लाख रुपयांपर्यंत वाहन खरेदीसाठी कर्ज मिळते.

X
COMMENT