आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा, राजीनामा देऊन राजकारणात या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि त्यांच्या निधीतून होणाऱ्या कामांवर फलक लावण्यास मुद्दाम टाळाटाळ केली जाते. नागरिकांना लोकप्रतिनिधींविषयी चुकीची माहिती देऊन राजकारण केले जाते. असले प्रकार करण्यापेक्षा सरळ नोकरी सोडून राजकारण करा, अशा शब्दात आमदार हरिभाऊ जावळे यांनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आय.वाय.पाटील यांना आढावा बैठकीत धारेवर धरले. 


यावल पंचायत समितीमध्ये सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत आमदार जावळे यांनी, दुष्काळी स्थितीत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. या बैठकीत पंचायत समिती सदस्यांनी कनिष्ठ अभियंता आय.वाय.पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. सेष फंड, लोकप्रतिनिधीच्या स्थानिक विकास निधीतून केल्या जाणाऱ्या कामांविषयी पाटील नागरिकांमध्ये चुकीची माहिती देत राजकारण करतात, असा आरोप केला. यानंतर आमदारांनी पाटील यांना आमदार निधीतून केलेल्या कामांच्या ठिकाणी बोर्ड लावण्याबद्दल विचारणा केली. तसेच यावल तालुका संस्कारक्षम राजकारणाचा तालुका आहे. आम्ही केवळ निवडणुकीपुरते राजकारण, नंतर समाजकारण करतो. त्यामुळे शासकीय सेवेत राहून उगीच राजकारण करून वातावरण दूषित करू नका. त्याऐवजी नोकरी सोडून थेट राजकारणात या, अशा शब्दात सुनावले. सभापती पल्लवी चौधरी, जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव, नंदा सपकाळे, पं.स.सदस्य दीपक पाटील, योगेश भंगाळे, विजय मोरे, विलास चौधरी, हर्षल पाटील, उज्जैनसिग राजपूत, ज्ञानेश्वर तायडे, भारती चौधरी, बीडीओ किशोर सपकाळे, नारायण चौधरी उपस्थित होते. 


या मुद्द्यांवर चर्चा

तालुक्यातील घरकुलांची सद्यस्थिती, वैयक्तीक लाभातील शौचालय बांधकाम आढावा, कृषी विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, समाज कल्याण विभागाकडून मागसवर्गीयांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना, जलसंधारणाची गेल्या वर्षातील व यंदाची मंजूर कामे, आरोग्य केंद्र इमारत बांधकामाचा आढावा. व डॉक्टरला मुख्यालयी थांबवण्याची सूचना. 

 

पं.स.ची नवीन इमारत 
यावलमध्ये पंचायत समितीची नवीन इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी २ कोटी ७८ लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामाचे २६ जानेवारीला भूमिपूजन होईल, असे आमदार जावळेंनी सांगितले. यापूर्वी ५२ वर्षांपूर्वी पंचायत समिती इमारतीचे बांधकाम झाले होते. दरम्यान, बैठकीत गट शिक्षण अधिकारी एजाज शेख यांनी, जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल होत आहेत. मात्र, शाळेतील वीज बिल भरण्यासाठी आर्थिक तरतूद नाही. ग्रामपंचायतींना सांगूनही प्रतिसाद मिळत नाही, असा मुद्दा मांडला. मात्र, वीज बिलासाठी तरतूद करू, असे आश्वासन आमदारांनी दिले. 

बातम्या आणखी आहेत...