आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणेंसह त्यांच्या साथीदारांचे कणकवली पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण, उपअभियंत्याला धक्काबुक्की करणे पडले महागात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंधुदुर्ग- रस्त्याच्या दुरावस्थेमुळे उपअभियंत्याला धक्काबुक्की करुन, चिखलांची बादली अंगावर ओतणे आमदार नितेश राणेंना चांगलेच महागात पडले आहे. नितेश राणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. नितेश राणे यांनी स्वत:हून कणकवली पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. त्यांना उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे.


उपअभियंते प्रकाश शेडेकर यांनी नितेश राणेंविरोधात कुडाळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर नितेश राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांनी दंगल नियंत्रणपथकसह नितेश राणेंच्या घराबाहेर हजेरी लावली. कुडाळ पोलिस ठाण्यात नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध 353,342,143,148,149 या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये आमदार नितेश राणे, मिलींद मेस्त्री, संदीप सावंत, निखीला आचरेकर, मामा हळदीवे, मेघा गांगण यांचा समावेश आहे.


गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते आहे. यासाठी नितेश राणे यांनी आक्रमक पावित्रा घेत उपअभियंत्याला धक्काबुक्की केली. आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधण्याच्या प्रयत्न करुन, थेट हायवेवरील चिखलाने आंघोळ घातली तसेच शेडेकर यांना शिव्याही दिल्या.


त्याच्याकडून चूक झाली, मी माफी मागतो- नारायण राणे
आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरच नव्हे, तर माध्यमांवर सुद्धा लावून धरण्यात आला. यानंतर त्यांचे वडील नारायण राणे यांनी माध्यमांसमोर मुलाच्या कृत्याची माफी मागितली. सोबतच, ते आंदोलन करत होते आणि चिखलाच्या बादल्या स्वतः नितेश यांनी फेकलेल्या नाहीत असा पावित्रा देखील घेतला. परंतु, नितेश राणे यांनी या प्रकरणी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच यापुढे हायवेचे काम व्यवस्थित कसे होत नाही हे हातात छडी घेऊन पाहणार आहे. असेही नितेश राणे म्हणाले आहेत.