आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदाराच्या सुटकेसाठी 1 हजार कार्यकर्त्यांनी रक्ताने लिहीले निवेदन, युवासेना प्रमुख अदित्य ठाकरेंकडे केले सुपूर्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पापरी- नेत्यांसाठी कार्यकर्ते काय करतील याचा काही नेम नसतो. असेच एक उदाहरण सोलापूरात घडले आहे. आमदार रमेश कदम यांच्या सुटकेसाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना आमदार रमेश कदम युवा मंचाच्या सोलापूर जिल्ह्यातील आणि मोहोळ मतदार संघातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी सुमारे 1 हजार रक्ताच्या सह्यांचे निवेदन दिले. 


याबाबत रमेश कदम युवा मंच महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अमित वाघमारे यांनी सांगितले की, गेल्या 46 महिन्यांपासून लोकशाहीर आण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आमदार कदम शासनाच्या ताब्यात आहेत. ते ज्यावेळी मोहोळ मतदार संघात निवडून आले होते, तेव्हा 7 महिन्यातच कामाचा झंजावात सुरू केला होता. त्यांनी "मागेल त्याला पाणी" "मागेल त्याला रस्ता" इत्यादी योजना राबवल्या, त्या लोकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. पण आमदार कदम हे मतदार संघात उपस्थित नसल्याने विकास खुंटला आहे.

 

आमदार कदम यांनी जाती पातीचे राजकारण कधी केले नाही. मराठा आरक्षण पाठिंबा संदर्भात राजीनामा देणारे ते पाहिले मागास वर्गीय आमदार होते. मोहोळ मतदार संघातील जनता त्यांनी केलेल्या कामाची आजही जाण ठेवून आहे आणि त्यांची वाट पाहत आहे. शिवसेना सत्तेत आहे म्हणून शासन दरबारी आमच्या भावना पोहोचाव्यात यासाठी हे निवेदन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना ते मोहोळ दौऱ्यावर आले असता देण्यात आले. यावेळी आमदार कदम यांचे स्वीय सहाय्यक राम कोरके, सुधीर गोरे यांच्यासह आमदार कदम समर्थक व मोहोळ मतदार संघातील ग्रामस्थ उपस्थित होते.