आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाचा आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वत:चे घर तपासावे; आमदार संग्राम जगताप यांचा शिवसेनेला टोला 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- राष्ट्रवादी पक्षात काय घडतंय यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज नाही, तुम्ही आम्हाला पक्ष निष्ठा शिकवू नका. आमच्यावर पैशाचा आरोप करण्यापूर्वी स्वत:चे घर तपासले पाहिजे. मतदान झाले असते तर त्यांना समजले असते शिवसेनेचे किती लोक तुमच्या बरोबर आहेत. पण ही परिस्थिती कळाल्यामुळेच काहीतरी कारण काढून तुम्ही सभागृहाबाहेर गेले, असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे नाव न घेता लगावला.

राठोड यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आमदार जगताप यांच्यावर टीका केली होती. या टिकेला आमदार जगताप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्त्युत्तर दिले. यावेळी शहराध्यक्ष माणिक विधाते, गटनेते संपत बारस्कर, नगरसेवक गणेश भोसले, विनित पाऊलबुद्धे, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, संजय घुले, कुमार वाकळे आदी उपस्थित होते. 

 

आमदार जगताप म्हणाले, शिवसेनेने राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला होता. त्याचा खुलासाही आम्ही वरिष्ठ मंडळींना केला होता. किती शिवसेनेच्या नेत्यांनी आमच्या श्रेष्ठींना पाठिंब्यासाठी फोन केले. त्याचेही चिंतन केले पाहिजे. नंतर ही भाषा वापरले पाहिजे. सध्या भाजपला मतदान केले त्याचा खुलासा आम्ही केला आहे. खुलासा हा आमच्या नगरसेवकांचे मत आहे, तो त्यांनी केला. पण खुलासा काय द्यायचा हे यांच्या उपनेत्याकडून विचारायला ते आयएसओ प्रमाणपत्र नाही. त्यांनी इतर पक्षाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही. त्यांना दरवेळी राष्ट्रवादीचे काय चालले याची बारकाईनी लक्ष ठेवण्याची आवश्यकता नाही. पण त्यांना झोपताना उठताना राष्ट्रवादी दिसते यामागे त्यांची बेचैनी झाल्यासारखे त्यांच्या भूमिकेतून कळते. 

 

राजकारणासाठी तुम्ही कोणत्या स्तरावर जाऊ शकता याची अनेक उदाहरणे आहेत. नगरच्या शिवसेनेत ज्यांनी प्रामाणिक काम केले त्यांना तुम्ही रिक्षाचालक किंवा पानटपरी चालकापेक्षा मोठे होऊ दिले नाही. मोठे संख्याबळ असतानाही तुमचा महापौर होऊ शकला नाही, हे शल्य तुमच्या नगरसेवकांच्या मनात आहे. तुम्ही केवळ आमदारकी उपभोगली, पण विकास झाला नाही. शहरात बंद पडलेला कचरा प्रकल्प, बससेवा, पाणीपुरवठा, पगार, पेन्शनची अनेक कामे ठप्प आहेत. तुमच्याकडे व्हिजन तर नाहीच, शिवाय पक्षनिष्ठेबाबतही प्रश्नचिन्ह आहे. तुमचे सरकार असताना अकरा महिन्यात तुमचे मंत्रिपद का गेले ? याचाही तुम्ही विचार करायला हव, असेही जगताप म्हणाले. 

 

तुम्ही अनेक लोकसभेच्या निवडणुकांत युतीचे काम केले नाही, उलट इतर पक्षाचे काम केले. त्यामुळे तुम्ही आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये. कोणत्या निवडणुकीत तुम्ही शिंगावर येण्याची भाषा करता, ज्यावेळी २०१४ विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे. आता घोडा मैदान लांब नाही, नगरकर पुन्हा एकदा तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल.आमदार म्हणून काम करत असताना आम्ही शहरासाठी निधी आणला. पण पण यांनी सातत्याने शहर बदनाम करण्याचे काम केले. एका उद्योजकाला रस्त्यावर मारहाण केली. 

पाठिंब्याचा विषय मी आणि नगरसेवकांनी घेतलेला निर्णय आहे. आज राजकारण पणाला लागण्यापेक्षाही शहराच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे. निवडणूक संपल्यानंतर राजकीय जोडे बाजुला ठेवता आले पाहिजे. राजकारण किंवा सोयरिक हा स्वतंत्र विषय आहे. राष्ट्रवादीने काय करायचे हे सांगणारी शिवसेना आयएसओ मानांकन नाही ? रात्रंदिवस त्यांना संग्राम जगतापच दिसतो. माझा विषय त्यांच्या डोक्यातून जात नाही. तुमचे परिवहन मंत्री आहेत, तुम्ही शहर बस का सुरू केली नाही. त्यांच्या मंत्र्याचा फायदा नगरकरांना नाही, केवळ शिवसेनेसाठी फायदा करून घेतला जात आहे. तु्ही कधी पैशांचा आरोप करता तर कधी केडगावचा विषय सांगितला जातो, पण काय आरोप करायचा ते आता त्यांनाच कळेना असा टोलाही जगताप यांनी लगावला. 

 

आगामी निवडणुकीवर परिणाम नाही 
आगामी लोकसभा, विधानसभेचा मनपातील पाठिंब्याच्या घटनेशी काहीही संबंध नाही. त्या निवडणुकीत भाजपशी दोन हात आम्हाला करावे लागणार आहे. नेत्यांनी जबाबदारी दिली तर पदाधिकाऱ्यांसह सर्व १८ नगरसेवक ती जबाबदारी पार पाडतील. 

 

घोडा मैदान दूर नाही 
तुम्ही शिंगावर घेण्याची भाषा करता, पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे. आता घोडा मैदान लांब नाही, नगरकर पुन्हा एकदा तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असा टोलाही शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना जगताप यांनी लगावला. 

 

११ महिन्यांत मंत्रीपद का गेले 
युतीचे सरकार असताना उपनेते अनिल राठोड यांचे मंत्रीपद अवघ्या ११ महिन्यात का काढून घेतले. ते कोणत्या निष्ठेमुळे हे नगरकरांना माहित आहे. त्यामुळे पक्षनिष्ठेच्या गप्पा तुम्ही मारु नका, अशीही आमदार जगताप यांनी केली. 

 

कळमकर ज्येष्ठ नेते 
भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय ऐनवेळी मी आणि नगरसेवकांनी घेतला आहे. तसे मी यापूर्वीच स्पष्टही केले आहे. दादाभाऊ कळमकर हे आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांना कोणीही विरोध केला नाही. तसेच कोणी विरोध करणारही नाही, असेही आमदार जगताप यांनी सांगितले. 

 

प्रसंगी भाजपलाही जागा दाखवू 
भाजपकडून जर काही चुकीचे निर्णय झाले तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करणार आहे. प्रसंगी आंदोलनही कर. चुकीचा निर्णय जर घेतला जात असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. प्रसंगी भाजपचा पाठिंबाही काढू असेही आमदार जगताप यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...