आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तारांचे बंड थंड होण्याच्या दिशेने; भाजपमध्ये जाणार नाही, नवीन पक्षही नाही : अब्दुल सत्तार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर होताच सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाचा झेंडा हाती घेत मी अपक्ष लढणारच, असे म्हणत शड्डू ठोकले होते. शनिवार व रविवार असे दोन दिवस सत्तार हे प्रसिद्धीच्या झोतात होते. सोमवारी त्यांनी अधिकृतपणे पत्रकार परिषद बोलावून ‘अपक्ष लढायचे की नाही हे मी नव्हे तर माझे कार्यकर्ते ठरवतील. २९ मार्चला आमखास मैदानावर 
समर्थकांचा मेळावा होणार आहे. त्यात कार्यकर्ते ठरवतील तेच होईल, असे सत्तार यांनी स्पष्ट केले.  दरम्यान, काँग्रेसने औरंगाबाद मतदारसंघातून सुभाष झांबड यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सत्तार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. भाजपबरोबर जाणार नाही आणि दुसरा पक्षही काढणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सत्तार यांचे हे वक्तव्य म्हणजे ते आता आपली तलवार म्यान करतात की काय, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, औरंगाबादेतूनही उमेदवार बदलला जाणार असल्याची चर्चा असली तरी त्यावर बोलण्यास प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी नकार दिला आहे. या विषयावर काहीच बोलायचे नाही, असे ते ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले..

 

 

आमदार हर्षवर्धन जाधव, आमदार सुभाष झांबड आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यापाठोपाठ सोमवारी आमदार इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या आमदारांची संख्या चार झाली आहे. दरम्यान, काँग्रेस पक्ष आपल्याला उमेदवारी द्यायला तयार झाला आहे. मात्र, आता उमेदवारीबाबतचा निर्णय आपण २९ तारखेला कार्यकर्त्यांशी चर्चा करून जाहीर सभेत घोषित करू, असा पवित्रा आज काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतला आहे. 
आमदार सुभाष झांबड यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच आमदार सत्तार यांनी त्याला विरोध करीत आपण अपक्ष उमेदवारी करणार असल्याची घोषणा केली होती. त्याच रात्री ते मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांना भेटले होते. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही भेट निधीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी असल्याचा दावा केला. आता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्याला उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, आपण आपला निर्णय २९ तारखेला जाहीर करू, अशी पुष्टी त्यांनी जोडली. 

 

अशोक चव्हाण म्हणाले, सत्तार यांना पूर्वीच तंबी दिलीय, आता संबंध नाही    
सत्तार यांच्या भूमिकेमागे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण तर नाहीत ना, अशी चर्चा आहे. कारण सत्तार हे चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ‘दिव्य मराठी’ने चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सत्तार यांनी अपक्ष लढण्याच्या बाता मारू नयेत. यासाठी आम्ही पूर्वीच स्पष्ट शब्दांत तंबी दिली आहे. तरीही ते लढण्याची भाषा करत असतील तर ते जाणे आणि त्यांचे राजकारण जाणे, त्यांच्याशी आमचा संबंध नाही. 

 

 

मी प्रस्ताव दिलाय, त्यांनी विचार करावा : झांबड    

सत्तार यांना लढायचे असेल तरी माझी माघार आहे, असा प्रस्ताव मी कालच त्यांना दिलाय. आता यावर त्यांनी विचार करावा. पक्षाने आदेश दिला तर सत्तार यांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे सत्तार यांच्या पत्रकार परिषदेनंतर झांबड म्हणाले. तर झांबड यांनी प्रस्ताव दिला असला तरी उमेदवारी बदलण्याचा अधिकार श्रेष्ठींना आहे, झांबड यांना नाही, असे सत्तार म्हणाले.    
 

 

इम्तियाज यांचीही उमेदवारी :

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीवरदेखील शिक्कामोर्तब झाल्यामुळे आता अब्दुल सत्तार उमेदवारी करतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


या उमेदवारीबाबत स्पष्टता नव्हती म्हणून सत्तार यांनी आपल्या उमेदवारीबाबतही ठोस विधान केले नसावे, असे मानले जाते आहे. ज्या प्रकारची विधाने सत्तार यांनी पत्रकार परिषदेत केली त्यावरून पहिल्या दिवशी उपसलेली तलवार म्यान करायला सुरुवात केल्याचेच संकेत मिळत होते. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीचा हा परिणाम आहे का, असाही प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे. मात्र, ही भेट सिल्लोड नगरपालिकेला मिळालेल्या निधीसाठी आभार मानण्याकरिता होती, असे त्यांनी सांगितले.

 

 

समर्थक म्हणाले तरच निवडणूक लढवणार : सत्तार

काय म्हणाले सत्तार  :

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचेच जेथे ऐकले जात नाही तेथे मी त्यांचे का ऐकावे, म्हणून मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. माझे समर्थक कार्यकर्ते काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी २९ तारखेला आमखास मैदानावर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तेथे कार्यकर्ते म्हणाले अपक्ष लढा, तर लढणार. कार्यकर्ते म्हणाले नाही लढायचे, तर नाही लढणार. कार्यकर्त्यांशी विचारविनिमय झाल्याशिवाय लढणार नाही, असे त्यांनी  स्पष्ट केले.    
 

 

पक्षाने उमेदवारी दिली तरी कार्यकर्तेच ठरवतील   :

सत्तार लढणार असतील तर मी माघार घेतो, असे झांबड यांनी रविवारी जाहीर केले होते. त्याबद्दल विचारले असता, सत्तार म्हणाले, पक्षाने उमेदवारी दिली तरी लढायचे की नाही हे कार्यकर्तेच मेळाव्यात निर्णय घेतील. पक्षाने उमेदवारी दिल्यानंतरही कार्यकर्ते म्हणाले लढायचे नाही, तर लढणार नाही. कार्यकर्ते म्हणाले झांबडांचा प्रचार करा, तर तसेही करेन.    

 

जालना नको, तेथील समीकरण वेगळे :

तुम्ही जालन्यातून का लढत नाही, असा थेट प्रश्न केला गेला. त्यावर सत्तार म्हणाले, मला जालना नकोय, तेथील समीकरणे वेगळी आहेत. त्यामुळे मी फक्त औरंगाबादेतूनच मागणी केली होती. जालन्यातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पाडण्यासाठी आपण जंग जंग पछाडू, असे सत्तार यांनी पूर्वी म्हटले होते. परंतु आता ते दानवेंच्या विरोधात लढण्यास राजी नाहीत. कारण त्यांना हा मतदारसंघ त्यांना सुरक्षित वाटत नाही.    

 

महाजन यांचा फोन आला अन् मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो  :

अपक्ष म्हणून जर लढायचे असेल तर मग मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली, असा प्रश्न केला असता ते म्हणाले, मी स्वत:हून मुख्यमंत्र्यांना भेटणारच होतो. परंतु त्याआधीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला. रात्री उशिरा मुख्यमंत्री नागपूरहून आले अन् भेट झाली. गेल्या साडेचार वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी विरोधी पक्षात असूनही माझ्या मतदारसंघासाठी मोठा निधी दिला. त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी भेटलो. त्याचा अर्थ मी भाजपमध्ये जाणार असा कोणी काढू नये. मी कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नाही.    
 

 

भाजपनेच क्लिप व्हायरल केली  :

मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या भेटीची व्हिडिओ क्लिप भाजपनेच व्हायरल केल्याचा दावा सत्तार यांनी केला. ते म्हणाले, तेथे आणखी एक मंत्री उपस्थित होते. त्यांनी शूटिंग केली. ती क्लिप व्हायरल केली तर चालेल का, असे मला विचारले. मी म्हणालो, मला काहीही अडचण नाही. तुमच्याच युतीला प्रॉब्लेम येईल. त्यानंतर त्यांनी ती समाज माध्यमांवर टाकली. त्याचा आवाज कसा काय गायब झाला, असाही प्रश्न केला तेव्हा त्याचे उत्तर माझ्याकडे कसे, सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांना विचारा, असे ते म्हणाले. शूटिंग करणारे तिसरे मंत्री कोण, याचे उत्तर त्यांनी दिले नाही.    

 

स्वत:चे मतदान मतदारसंघात नाही :

सत्तार यांचे स्वत:चे मतदान हे सिल्लोड येथे आहे. ते औरंगाबादेत चुकून लढले तर त्यांचे स्वत:चेच मतदान त्यांना करता येणार नाही.     

 

हे होते सोबत  :

पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशव औताडे, डॉ. कल्याण काळे यांचे समर्थक तथा औरंगाबाद तालुका अध्यक्ष रामराव शेळके,  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, सदस्य किशोर बलांडे, पैठणचे नगराध्यक्ष जितसिंग करकोटक, प्रा. सतीश बनसोड एवढे समर्थक उपस्थित होते.    
 

 

बातम्या आणखी आहेत...