आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाणांच्या मनाविरुद्ध उमेदवारी दिल्यानेच आमदार सत्तार यांचे बंडाचे निशाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आधी सुभाष झांबड यांचे नाव औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी पाठविल्याची घोषणा केली होती. नंतर त्यात शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांचे नाव त्यांनी घातले आणि काल रात्री आमदार झांबड यांना उमेदवारी घोषित होताच स्वत:च बंडाचा झेंडा फडकवला. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा, हा सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील चर्चेचा मुद्दा बनला आहे. सत्तार यांच्या या घोषणेचा नेमका ‘अर्थ’ सांगणारे काही व्हाॅटस्अॅप मेसेज फिरू लागले आहेत खरे;  पण ते काही खरे असेल असे नाही. मग आमदार अब्दुल सत्तार यांनी अचानक हा पावित्रा का घेतला असेल?

 


हर्षवर्धन जाधवांचे नाव श्रेष्ठींकडूनच
आमदार हर्षवर्धन जाधव यांचे नाव इच्छुकांच्या यादीत पाठवावे, अशी सूचना आपल्याला वरिष्ठांनी केली होती, असे आमदार सत्तार यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. याचा अर्थ, मुस्लिम मते इम्तियाज घेऊन जाणार असतील तर मराठा मतांसाठी आपल्याकडे आमदार जाधव असावेत, असे गणित अशोक चव्हाण यांनी केले असावे. हे गणित त्यांनी सत्तार यांना समजावूनही सांगितले असावे. त्यामुळेच “हर्षवर्धन यांना उमेदवारी दिली असती तर मला ही वेळ आलीच नसती” असेही सत्तार म्हणून गेले. याचा अर्थ हर्षवर्धन हे अशाेक चव्हाण यांचे उमेदवार होणार होते. पण ऐन वेळी त्यांच्याऐवजी झांबड यांना तिकीट मिळाले. झांबड हे नाव मुकुल वासनिक यांच्याकडून फायनल झाले असेल अशीही शक्यता आहे. त्यामुळेच व्हायरल झालेल्या फोन रेकाॅर्डमध्ये अशोक चव्हाण त्रासलेले वाटतात. जर आपल्या साहेबांचे न ऐकता झांबड यांना उमेदवारी दिली जात असेल तर दिल्लीश्वरांना धडा शिकवला पाहिजे, अशी भावना अशोक चव्हाण समर्थक म्हणून आमदार सत्तार यांची असेल आणि म्हणूनच त्यांनी तातडीने बंडाचा झेंडा रोवला असेल अशीच शक्यता जास्त आहे. किंवा अब्दुल सत्तार यांना अशोक चव्हाणांचीही फूस असू शकते, असा अर्थ कोणी काढला तर तो अगदीच अप्रस्तुत मानता येणार नाही, अशी ही परिस्थिती आहे. 

 

 

राजकीय गणित फिसकटणार
आता अब्दुल सत्तार यांनी खरोखरच बंडखोरी केली आणि एमआयएमतर्फे इम्तियाज जलील हेही उमेदवार असले तर अर्थातच मुस्लिम मतांत विभाजन होईल. इम्तियाज यांच्याकडे बहुजनांची मतेही वंचित आघाडीमुळे वळू शकतील. जे मुस्लिम एमआयएमला मते देणार नाहीत ती मते अब्दुल सत्तार यांना मिळतील. अशा परिस्थितीत हिंदुत्ववादी मतांच्या विभागणीचाच प्रश्न शिल्लक राहतो. हर्षवर्धन जाधव त्यातली स्वत:कडे किती वळवू शकतात, यावर शिवसेनेच्या उमेदवाराचा फायदा-तोटा अवलंबून आहे. या सगळ्यापेक्षा अशोक 
चव्हाण यांच्या पक्षातील महत्त्वाविषयी आणि त्यांच्या भविष्यातील चालीविषयी त्यातून जी काही उत्सुकता वाढणार आहे ती अधिक रंजक असेल हे मात्र नक्की.

बातम्या आणखी आहेत...