आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाेबत सेल्फीसाठी आमदारांची धडपड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी तसेच त्यांच्याबरोबर हस्तांदोलन व सेल्फी काढण्यासाठी वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यांमध्ये रविवारी मोठी चढाओढ पाहावयास मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतला आजचा पहिला दिवस शांततेत गेला. त्यांनी आपल्या सहा मंत्र्यांचा सभागृहास परिचय करून दिला.

विधान परिषदेच्या कामकाजास दुपारी वंदे मातरम््ने सुरुवात झाली. या वेळी सभागृहात विविध विभागांचे अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले.


विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडून गेले असल्याचे नमूद केले. तसेच चंद्रकांत रघुवंशी, अमरीशभाई पटेल, राहुल नार्वेकर, रामराव वडकुते यांच्या राजीनाम्याबाबत सभागृहास अवगत केले.

विधान परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत या नवनिर्वाचित मंत्र्यांचा सभागृहाला परिचय करून दिला, तर मंत्री सुभाष देसाई यांनी नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांचा परिचय करून दिला.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच विधान परिषद या ७८ सदस्यांच्या ज्येष्ठ सभागृहात आले. त्यांनी आज पांढरा झब्बा परिधान केला होता. विरोधी बाकावर तशी उपस्थिती कमीच होती. सभागृहाचे काही मिनिटांचे कामकाज बाकी असताना ते सभागृहात आले. सभापतींना नमस्कार केला आणि पहिल्या रांगेतील सुभाष देसाई यांच्या शेजारच्या आसनावर बसले.

उद्धव यांनी सहा मंत्र्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर शोकप्रस्ताव झाला व कामकाज संपले. त्यानंतर उद्धव हे विरोधी बाकावरच्या सदस्यांकडे गेले. त्यांनी सर्वांना नमस्कार केला. या वेळी अनेक आमदार त्यांना आपली ओळख करून देत होते, काही आमदारांनी त्यांच्याबरोबर सेल्फीसुद्धा काढली.

रिपाइंचे अनिल गोंडाणे यांना परिषदेत अादरांजली

१६ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे, अशी घोषणा करून सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभागृह संस्थगित केले.

रिपाइंचे आठवले गटाचे दिवंगत विधान परिषद सदस्य अनिल गोंडाणे यांना विधान परिषदेत आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या शोकप्रस्तावात नामांतर आणि दलित पँथर चळवळीतील त्यांच्या अनेक आठवणी भाई गिरकर, नीलम गोऱ्हे, शरद रणपिसे, जोगेंद्र कवाडे यांनी जागवल्या.

तालिका अध्यक्ष

विधानसभ तालिका अध्यक्षा म्हणून ॲड. श्रीमती यशोमती ठाकूर, तर सदस्य म्हणून शंभुराज देसाई, नवाब मलिक आणि कालिदास कोळंबकरांची नियुक्ती हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केली.
 

बातम्या आणखी आहेत...