आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांचे खिसे भरले; आम आदमीचे खिसे कापले, पेट्रोल-डिझेलवर लिटरमागे एक रुपयाची वाढ

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई - आधीच जागतिक मंदी, त्यात पुन्हा कोरोनामुळे महसुलाला बसलेला फटका, केंद्राकडून जीएसटी परताव्यास होणारा विलंब, राज्याच्या डोक्यावर वाढलेले कर्ज, तिजोरीत खडखडाट, नैसर्गिक आपत्तीने त्रस्त झालेला शेतकरी, वाढती बेरोजगारी अशी आव्हाने सांगत अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२०-२१ चा ९,५११ कोटींचा महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. यात आमदार निधी दोन कोटी रुपयांवरून तीन कोटी करत त्यांनी आमदारांना खुश केले. मात्र पेट्रोल-डिझेलवर  लिटरमागे  एक रुपयांची करवाढ करून आम आदमीच्या खिशाला कात्री लावली. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रोत्साहन योजना राबवणार असल्याने अगोदरच रिकाम्या झालेल्या तिजोरीत भर कुठून टाकणार हे सांगण्यास मात्र ते विसरले. अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी विधान परिषदेत सादर केला. राज्यावरील कर्जाचा बोजा चार कोटी ३३ लाख ९०१ कोटींपर्यंत पोहोचला असताना शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारांसाठी कोट्यवधींचा निधी जाहीर करीत मराठवाडा वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्ग, ग्रामीण विकासावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी जाहीर केले. आमदार निधी वाढवण्याची मागणी आमदार सतत करीत असतात. २०११ मध्ये अजित पवार यांनीच आमदार निधी दीड कोटी रुपयांवरून दोन कोटी रुपये केला होता आणि आता पुन्हा त्यात ५० टक्के वाढ करून तो तीन कोटी करीत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेवर संपूर्ण सभागृहाने जोरदार बाके वाजवून स्वागत केले. आमदार निधीच्या रकमेतील वार्षिक १० टक्के रक्कम शासकीय मालमत्तांच्या देखभाल-दुरुस्तीकरिता राखीव ठेवण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचेही अर्थमंत्र्यांनी नमूद केले.

अर्थसंकल्पातील 20 महत्त्वाच्या योजना, तरतुदी, घोषणा
> कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटी व प्रोत्साहन आणि एकवेळ समझोता योजनेसाठी १५ हजार कोटींची तरतूद
> जलसंधारण योजनांचे जलसंवर्धन योजनेअंतर्गत पुनरुज्जीवन
> शेतीपंपास नवी वीज जोडण्या देणार.
> शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी पुढील ५ वर्षांत ५ लाख सौरपंपाची योजना
> पुण्यात बाहेरून येणारी वाहतूक शहराबाहेर वळवण्यासाठी १७० किमी लांबीचा रिंग रोड बांधणार
> ग्रामीण भागातील रस्त्यांसाठीच्या योजनेअंतर्गत ४० हजार किमी बांधकाम
> नागरी सडक विकास योजनेसाठी १००० कोटींची तरतूद
> राज्यात ७५ नवीन डायलिसिस केंद्रे स्थापन करणार
> क्रीडा संकुलासाठी अनुदानात वाढ
> मुंबईत मराठी भवन बांधणार
> राज्य  परिवहन महामंडळाच्या ताफ्यात  १६०० नवीन बस येणार
> नंदुरबार, सातारा, अलिबाग, अमरावती इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार.
> पुढील चार वर्षांत १५०० आदर्श शाळा तयार करणार. यासाठी ५०० कोटींची तरतूद, सर्व शाळांना नेटने जोडणार
> शिक्षण विभागासाठी दोन हजार ५२५ कोटी व उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी १३०० कोटींची तरतूद
> ८० टक्के स्थानिकांच्या रोजगारासाठी कायदा करणार
> आरोग्य विभागासाठी ५ हजार कोटी
> रोज एक लाख शिवभोजन थाळी देणार. १५० कोटींची तरतूद.
> वरळीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल उभारणार
> प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलिस ठाणे
> नाट्यसंमेलनासाठी १० कोटींचे अनुदान

शेरोशायरीचे चौकार, कवितांचे षटकार
अर्थमंत्री अजित पवार यांनी सव्वा तासात अर्थसंकल्प मांडला. अजितदादांना शेरोशायरीची तशी फार आवड नाही, परंतु अर्थसंकल्प रटाळ होऊ नये म्हणून मधे-मधे हिंदी कवितांच्या ओळींची पखरण त्यांनी केली.

माय झाली सरपंच, दोरी झेंड्याची ओढिते, सावित्रीच्या रांगोळीचा एक ठिपका जोडिते
अवकाळी पावसाच्या मदतीच्या घोषणेनंतर अर्श मलसियानी यांच्या ‘पूछ अगले बरस में क्या होगा, मुझसे पिछले बरस की बात न कर, ये बता हाल क्या है लाखों का, मुझसे दो चार दस की बात न कर’ या ओळी उद‌्धृत केल्या. त्यानंतर त्यांनी दुष्यंतकुमार यांच्या कवितेतील ‘कौन कहता है कि आसमां में सुराग नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो’ या ओळी ऐकवल्या आणि महिला धोरणाला २५ वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख करीत केशव खटिंग यांच्या ‘माय झाली सरपंच, दोरी झेंड्याची ओढिते, सावित्रीच्या रांगोळीचा एक ठिपका जोडिते’ या ओळी म्हटल्या.

द्विवेदींची कविता खपवली हरिवंशराय बच्चनांच्या नावे
अजित पवार यांनी भाषणात असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गयी देखो और सुधार करो ही कविता हरिवंशराय बच्चन यांची असल्याचे सांगितले. परंतु ही कविता  बच्चन यांची नसून सोहनलाल द्विवेदी यांची असल्याचे खुद्द अमिताभ बच्चन यांनीच दोन वर्षांपूर्वी सांगितले होते.

पुढे वाचा, विभागनिहाय तरतुदी : मराठवाडा-कोरडाच, उ. महाराष्ट्र-दुर्लक्षित, प.महाराष्ट्र -तरतुदींचा पाऊस

बातम्या आणखी आहेत...