आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या कार्यकर्त्यांकडून परप्रांतीय कामगारांना मारहाण, चार जण ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदनझिरा : जालना शहरातील औद्योगिक वसाहतीतील एलजीबी ब्रदर्स कंपनीतील कामगारांचा दोन आठवड्यांपासून संप सुरू आहे. मागण्यांसाठी काही दिवसांपासून कंपनीसमोरच कामगारांनी उपोषणही सुरू केले आहे. परंतु, उपोषण सुरू असतानाही कंपनीत काही परप्रांतीय कामगार येत असल्यामुळे त्या परप्रांतीय कामगारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करीत कामगारांजवळील असलेल्या बोलेरो गाडीचीही तोडफोड केल्याची घटना जालना-औरंगाबाद मार्गावरील टोलनाक्याजवळ मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात चार जणांना चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जालना-औरंगाबाद रोडवरील नवीन औद्योगिक वसाहतीमधील फेज-३ मध्ये असलेल्या एलजीबी ब्रदर्स कंपनीत पंधरा दिवसांपूर्वी कामगार आणि व्यवस्थापनामध्ये वाद सुरू आहे. यामुळे अनेक कर्मचारी उपोषणास बसले आहेत. याबाबत कामगार अधिकारी, माजी राज्यमंत्री हे येऊन त्यांनीही समज दिली आहे. परंतु, अजूनही हा वाद मिटलेला नाही. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या उपोषणामुळे कंपनी सध्या दुसऱ्या युनिटमधून कामगार आणून काम करून घेत आहे. दरम्यान, कंपनीच्या व्यवस्थापनाने मंगळवारी सकाळी रुइंदेवाडी परिसरात राहणारे काही कामगार एका जीपमधून कंपनीत कामावर आणत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी रिलायन्स पेट्रोल पंपासमोर ही बोलेरो गाडी अडवून काहींना मारहाण केली. यामुळे या परिसरात एकच खळबळ उडून जीपमधील कर्मचारी या ठिकाणाहून पळून गेले.आठ जणांवर गुन्हा दाखल


याप्रकरणी कंपनीचे अभियंता मारियपन देवेंद्रन (२८,तुट्टुगुड्डी, तामिळनाडू) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राहुल रत्नपारखे, मिन्नी शाईवाले, अमोल खारगे, महेश नागवे यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगार बसून आलेल्या गाडीच्या काचाही फोडल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा उल्लेख असलेली पत्रके व रुमाल गाडीत टाकून पळून गेले. या घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी विविध ठिकाणांहून चार जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई चंदनझिरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, उपनिरीक्षक प्रमोद बोंडळे, अनिल काळे आदींनी पार पाडली आहे. अधिक तपास कांबळे हे करीत आहेत.

व्हिडिओ व्हायरल


बोलेरो जीपमधून कामगारांना उतरवून चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, या प्रकरणात दुपारी २ वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर दोनच तासांत पोलिसांनी चौघांनाही शहरातील विविध ठिकाणांहून ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...