आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MNS And Shiv Sena Leaders Child Learning In English School

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या मनसे, सेना नेत्यांची मुले, नातू इंग्रजी शाळेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी इंग्रजी साहित्यिकाला बोलावले म्हणून राड्याची भाषा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे औरंगाबाद जिल्ह्यातील नेते तसेच मराठी आमचीच भाषा असा दावा करणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे मुले तसेच नातवंडे ही इंग्रजी शाळेतच शिक्षण घेत आहेत. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ असाच काहीसा हा प्रकार आहे.   


९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार होते, परंतु मनसेने यास विरोध केल्याने त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले. साहित्यिक जगतातून यास मोठा विरोध झाला. त्यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. अर्थात, सहगल या संमेलनाला येणार नाहीत हे जवळपास नक्की झाले आहे, परंतु इंग्रजीला विरोध करणाऱ्यांचे काय, असा प्रश्न समोर येतो. तेव्हा ‘दिव्य मराठी’च्या वतीने मनसे व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची मुले कोणत्या शाळेत शिकताहेत किंवा शिकली याची माहिती घेतली तेव्हा सर्व जण इंग्रजीला जवळ करत असल्याचे दिसून आले.   


मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांची कन्या पोदार जम्बो किड्स या शाळेत शिकते. माजी जिल्हाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांची दोन्ही मुले किड्स किंगडम या शाळेत शिकतात, माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणीवर असलेले भास्कर गाडेकर यांची मुले एसबीओए या शाळेत शिकतात.  या सर्व शाळा इंग्रजी आहे हे वेगळे सांगणे न लगे.  शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांची नात नक्षत्रवाडी येथील त्यांच्यासाठी लहानशा वाटत असलेल्या इंग्रजी शाळेत शिकते. खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे नातू व नगरसेवक सचिन खैरे यांची मुले नाथ व्हॅली शाळेत शिकतात. स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांच्या दोन्ही मुली होलिक्रॉस शाळेत शिकल्या आहेत. सभागृहनेते विकास जैन यांची दोन्ही मुले नाथ व्हॅलीचे विद्यार्थी होते. मध्यचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांचीही मुले नाथ व्हॅलीत शिकतात. मनसे व शिवसेना हे दोन्ही पक्ष जेथे मराठी अस्मिता पुढे करून राजकारण करतात त्यांच्याच घरात सायंकाळी इंग्रजीचे 'होमवर्क बुक' त्यांच्या पुढ्यात असते. ते मुलांचा इंग्रजीतूनच अभ्यास करून घेतात हे स्पष्ट होते.