आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे, ‘वंचित’ला बरोबर घ्या! अन्यथा लोकसभेच्या पराभवाची पुनरावृत्ती होईल; आघाडीच्या बैठकीत सूर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडीला बरोबर घ्या, अन्यथा लोकसभा निकालाची राज्यात पुनरावृत्ती होईल, अशी भीती संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या ५६ पक्ष-संघटनांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे राज ठाकरे व अॅड. प्रकाश आंबेडकरांचा आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलाच भाव वधारणार आहे.


मंगळवारी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर महाआघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यात लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, ‘या बैठकीत विधानसभा निवडणूक सर्व पुराेगामी पक्षांनी एकत्र येऊन लढायचे ठरले आहे. यासंदर्भात आणखी बैठका होतील. तसेच ज्या काँग्रेसच्या आमदारांनी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘५६ पक्षांच्या महाआघाडीत वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटते. मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा झाली नाही’.  ‘आम्ही पराभवाने खचणारे नाहीत. लवकरच आंदोलन चालू करणार आहोत’, असे राजू शेट्टी म्हणाले.
 

पार्थचा पराभव माझाच : अजित पवारांची कबुली
लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात मुलाच्या पराभवावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. पार्थच्या पराभवाची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा पराभव मी स्वीकारला आहे. तसेच जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला असून पराभवाची जबाबदारी अजित पवार म्हणून माझीच आहे, अशी कबुली अजित पवारांनी या वेळी दिली. 

 

वंचित डोकेदुखी ठरणार : 

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला यापुढे समसमान पातळीवर येऊन चर्चा करावी लागेल, असे नुकतेच सूतोवाच केले. त्यामुळे आंबेडकर विधानसभेला किमान १०० जागा मागू शकतात. इतक्या जागा ‘वंबआ’ला सोडल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक मतदारसंघ सोडावे लागतील. त्यामुळे या दोन्ही पक्षांत बंडखोरीची मोठी लागण होऊ शकते.