आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंनी राळेगण सिद्धीमध्ये जाऊन घेतली अण्णांची भेट, अण्णांच्या आंदोलनामुळेच मोदी सत्तेत आले-राज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - 'लाेकपालच्या मागणीसाठी तेव्हा विराेधी बाकावर असलेल्या लाेकांनी अांदाेलने केली, मात्र सत्तेवर येताच त्यांना लोकपालचा विसर पडला. त्यांनी देशाशी गद्दारी केली,' अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी साेमवारी उपाेषणाच्या सहाव्या दिवशी माेदी-फडणवीस सरकारवर टीका केली. पाच वर्षांपूर्वी अरुण जेटली, सुषमा स्वराज लोकपालवर भरभरून बोलत होते. मात्र, आता ही सर्व मंडळी मूग गिळून गप्प आहेत, असा समाचारही त्यांनी घेतला. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साेमवारी अण्णांची भेट घेऊन त्यांना उपाेषण मागे घेण्याचे अावाहन केले. लाेकपाल-लाेकायुक्त नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्या, या मागणीसाठी अण्णा हजारेंनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत बेमुदत उपाेषण सुरू केले अाहे. सरकारच्या भूमिकेविषयी अण्णा म्हणाले, 'राज्य सरकार म्हणते, माझ्या ९० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. मग उपोषणाला बसायला मी वेडा आहे का?' असा सवालही त्यांनी केला. हे सरकार खोटारडे आहे. शब्द न पाळण्यात काँग्रेसची डॉक्टरेट, तर भाजप ग्रॅज्युएट असल्याचा टाेलाही त्यांनी लगावला. 

 

अण्णा, सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करा : राज 
नरेंद्र मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान मी पाहिला नाही. मोदी व केजरीवाल यांनी सत्तेवर येण्यासाठी अण्णांचा वापर केला. आता मात्र त्यांना अण्णांचाच विसर पडला आहे. अाता भाजप सरकार पाडण्यासाठी अण्णांनी प्रयत्न करावेत, आमचा त्यांना पाठिंबा आहे, असे राज ठाकरेंनी राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बाेलताना सांगितले. पाच वर्षे झाली, अद्याप लोकपालबाबत कार्यवाही नाही. १८ डिसेंबरला मोदी यांनी ट्विट करून लोकपाल विधेयक मंजूर झाले पाहिजे, भाजपचा त्यास पाठिंबा आहे, असे जाहीर केले हाेते. आज मात्र ते विसरले आहेत. माणसे वापरून फेकून देणे एवढेच त्यांना माहिती आहे. नालायक सत्ताधाऱ्यांसाठी जीवावर बेतेल असे अण्णांनी काही करू नये, असेही राज म्हणाले. दरम्यान, यावर सत्ताधारी काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

 

मुख्यमंत्री मनातून उतरले : अण्णा हजारे 
राळेगणसिद्धी | जनतेचा विरोध पत्करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करत आहेत, असे विधान मी केले होते. त्यांना अनेक वेळा सांगून पाहिले, परंतु एका वर्षात लोकायुक्ताची नेमणूक होऊ शकली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री माझ्या मनातून उतरले असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धीस भेट देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, ठोस प्रस्ताव असेल तरच या, केवळ चर्चा करण्यात अर्थ नाही, असे आपण त्यांना सांगितल्याचे अण्णा म्हणाले. 


दरम्यान, उपोषणाच्या सहाव्या दिवशी हजारे यांचे वजन ४ किलो २०० ग्रॅमने घटले. रक्तातील साखर कमी झाली असून रक्तदाबही कमी-अधिक होत आहे. युरिनमध्ये किटोन आढळून आला आहे. थकवाही मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचे डॉ. धनंजय पोटे यांनी सांगितले. 

 

अाज निघेल ताेडगा 
केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी साेमवारी पुन्हा अण्णांशी चर्चा करून मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. मात्र अण्णा उपाेषणावर ठाम राहिले. अखेर मंगळवारी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना राळेगणमध्ये बाेलावले असून त्यांच्या लेखी अाश्वासनानंतर अण्णा हजारे उपाेषण मागे घेण्याची शक्यता अाहे. 
 

बातम्या आणखी आहेत...