आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभेबाबत मनसेचा निर्णय नाही, लढायचे झाल्यास नाशिकला पसंती 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी लोकसभा निवडणूक लढवावी किंवा नाही याबाबत मनसे नेतृत्वाचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यास गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत सातत्याने मोठ्या मतसंख्येचे दान मनसेच्या पदरात टाकणाऱ्या कल्याण, ईशान्य मुंबई आणि नाशिक या तीन लोकसभा मतदारसंघांत पुन्हा एकदा मनसे नशीब आजमावण्याची शक्यता आहे. अवघ्या महिनाभरात लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेता अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हालचालींना सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मनसेसाठी अनुकूल ठरू शकणाऱ्या मतदारसंघांचा आढावा घेतला. 

 

सोमवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीला मनसे नेते अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, अभिजित पानसे आणि सरचिटणीस तसेच प्रवक्ते संदीप देशपांडे हे उपस्थित होते. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेसोबत आपली कुठलीही चर्चा झाली नसल्याचे वक्तव्य केले होते. त्या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आजच्या बैठकीनंतर काही प्रतिक्रिया देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, या मुद्द्यावर राज यांनी मौन राखणेच पसंत केले. महाआघाडीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांद्वारे सुरू असलेल्या उलटसुलट वक्तव्यांच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे या बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्याने सांगितले. दरम्यान, आजच्या बैठकीत राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला अनुकूल ठरू शकणाऱ्या मतदारसंघातील २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील निकालांचा आढावा घेतला. विशेषकरून कल्याण, ईशान्य मुंबई आणि नाशिक या तीन लोकसभा मतदारसंघांत मनसेला मानणारा मोठा वर्ग आहे. यंदा लोकसभा लढवण्याचा निर्णय झाल्यास तीन मतदारसंघांवर मनसे लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. 

 

२००९ च्या निवडणुकीत नाशकात गोडसेंनी घेतली २ लाखांवर मते 
नाशिक लोकसभा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत मनसेच्या हेमंत गोडसे यांनी २ लाख १६ हजार मते मिळवली होती. त्या वेळी निवडणूक जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीर भुजबळ आणि गोडसे यांच्यामधील फरक अवघा चार टक्क्यांचा होता. तर २०१४ च्या निवडणुकीत मनसेतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रताप पवार यांना मोदी लाटेतही ६३ हजार मते मिळाली होती. ईशान्य मुंबईतही २००९ मध्ये मनसेच्या शिशिर शिंदे यांना तब्बल १ लाख ९५ हजार मते मिळाली होती, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांनी २००९ व २०१४ च्या निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते मिळवली होती.
 
२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या पाठिंब्याचा निर्णय साफ चुकला 
खरे तर मनसेने यापूर्वी लढवलेल्या लोकसभा निवडणुकाही फारसे नियोजन न करताच लढवल्या होत्या. त्यापैकी २००९ च्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मराठी अस्मितेचा मुद्दा ऐन भरात असल्याने त्या निवडणुकीत मनसेच्या बहुतेक सर्व उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत लाखांच्या घरात मते मिळाली होती. २०१४ मध्ये मात्र मोदींना ऐनवेळी पाठिंबा जाहीर करत शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवण्याचा मनसेचा निर्णय साफ चुकला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीबात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती या वेळी मनसेकडून देण्यात आली. 
 

बातम्या आणखी आहेत...