आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे शॅडो कॅबिनेट : बाळा नांदगावकरांना गृहमंत्रिपद?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोमवारी पक्षाचा १४ वा वर्धापनदिन साजरा करणार असून यानिमित्त नवी मुंबईत होणाऱ्या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. याच मेळाव्यात पक्षाच्या शॅडो कॅबिनेटचीही घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात गृहमंत्रिपदी बाळा नांदगावकर, वित्त मंत्रिपदी नितीन सरदेसाई, तर नगरविकास मंत्रिपदी संदीप देशपांडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.नवी मुंबईतल्या विष्णुदास भावे सभागृहात मनसेचा मेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. जवळजवळ अडीच तास ही बैठक चालली होती. बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आदी मनसे नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटवर बरीच चर्चा केली.विरोधी पक्ष सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम शॅडो कॅबिनेट करेलच, परंतु या सरकारच्या दैनंदिन कारभारावर लक्ष ठेवण्यासाठीही मनसेची ही टीम काम करणार आहे. यामध्ये नेत्यांना पक्षाचे ‘मंत्री’ म्हणून दर्जा देण्यात येणार असून त्यांच्यासोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ‘राज्यमंत्री’ म्हणून मानण्यात येणार आहे.नवी मुंबईत सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी माजली आहे. याच रणधुमाळीत मनसेने नवी मुंबईत वर्धापनदिनाचा मेळावा आयोजित केला आहे. पक्षाच्या वाढीसाठी राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलल्यानंतर आता नवी रणनीती आखली आहे. यंदा प्रथमच पक्षाचा वर्धापनदिन मुंबईबाहेर साजरा होणार आहे.असे असेल शॅडो कॅबिनेट

गृहमंत्रिपदी बाळा नांदगावकर, नगरविकास मंत्रिपदी संदीप देशपांडे, सांस्कृतिक मंत्री अमेय खोपकर, सहकार मंत्री दिलीप धोत्रे, महिला व बालकल्याण मंत्री म्हणून रिटा गुप्ता आणि वित्तमंत्रिपदी नितीन सरदेसाई अशा २५ ते २८ मंत्र्यांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षाचे थिंक टँक अनिल शिदोरे यांंनी ‘शॅडो कॅबिनेट’ बनवण्यात मुख्य भूमिका निभावली आहे.