Home | Maharashtra | Mumbai | MNS in Congress-NCP alliance news in Marathi

मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत घेण्यासाठी खलबते, मुंबई-ठाण्यात मनसेमुळे काँग्रेसला फटका

वृत्तसंस्था, | Update - Jul 17, 2019, 10:07 AM IST

मनसेला महाआघाडीत घेतल्यास त्याचा फटका काँग्रेसला आहे. कारण मुंबई, ठाण्यात मनसेला अनेक मतदारसंघ सोडावे लागू शकतात.

  • MNS in Congress-NCP alliance news in Marathi

    मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत घेण्यासंदर्भात मंगळवारी झालेल्या दोन्ही पक्षांच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. मनसेला आघाडीत घेतले तर किती जागा सोडणे शक्य आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या जागा वाटपाच्या सूत्रात कसा, कोणता बदल करावा लागेल, यावर चर्चा झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.


    आजची चर्चा प्राथमिक होती. आघाडीतील जागा वाटपाच्या सूत्रावर चर्चा झाली नाही. मित्रपक्षांवर चर्चा झाली. उद्या परत आम्ही बसणार आहोत. त्यात आम्ही मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या यावर निर्णय घेणार आहोत. जिंकणाऱ्या उमेदवाराला तिकीट द्यायचे यावर दोन्ही पक्षांत एकमत झाल्याचे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. मित्रपक्षांना बरोबर घेऊनच विधानसभेला आम्ही सामोर जाणारा आहोत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ मनसे, शेकाप, माकप, भाकप, स्वाभिमानी व इतर छोट्या पक्षांसाठी महाआघाडी मोठ्या संख्येने जागा सोडण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


    मुंबई, ठाण्यात मनसेमुळे काँग्रेसला फटका
    मनसेला महाआघाडीत घेतल्यास त्याचा फटका काँग्रेसला आहे. कारण मुंबई, ठाण्यात मनसेला अनेक मतदारसंघ सोडावे लागू शकतात. परिणामी काँग्रेसच्या वाट्याच्या जागा घटणार आहेत, यावर सोमवारच्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार, नसीम खान हजर होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते.

Trending