आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे समर्थकांसह पुन्हा स्वगृही परतले  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - भाजपशी मागील ५ वर्षांपासून संघर्ष सुरू असलेले प्रश्न मार्गी लागल्यानेच आपण पुन्हा युती केल्याचा खुलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. जुन्नर येथील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी हा खुलासा केला.   


शरद सोनावणे हे सुमारे ५ हजार समर्थकांसह शिवसेना भवन परिसरात दाखल झाले होते. २०१४ मध्ये मनसेत जातानाही त्यांनी अशा प्रकारे शक्तिप्रदर्शन केले होते. लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सोनावणे यांना जुन्नरमधून पुन्हा उमेदवारी देण्याचे आश्वासन शिवसेना नेतृत्वाने दिल्याचे समजते. मनसेचा आमदार म्हणून काम करताना अध्यक्ष राज ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आपल्याला योग्य मानसन्मान दिला होता. त्यामुळे पक्षनेतृत्वावर नाराज होऊन आपण पक्ष सोडत नसून पुन्हा घरची ओढ लागल्याने स्वगृही परतत असल्याचे सोनावणे म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सोनावणे यांचे स्वागत करत झाले गेले विसरून आगामी निवडणुकीत एकजुटीने कामाला लागण्याचे आदेश दिले. 


या वेळी त्यांनी पुन्हा भाजपसोबत युती करण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. शेतकरी मदत, नाणार प्रकल्प, मुंबईशी संबंधित काही प्रश्न अशा मुद्द्यांवर आमचे भाजपशी मतभेद असल्यानेच सत्तेत राहूनही आम्ही संघर्ष केला. मात्र ज्या प्रश्नावरून मतभेद होते ते प्रश्नच मार्गी लागल्याने पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. दरम्यान,मनसे सोडून गेल्यानंतर  आता  मनसे नेते किंवा राज  ठाकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांत देण्यात आली नाही. मात्र, यावर काही तरी राज भाष्य करतील, अशी शक्यता आहे.


युतीशिवायही शिवसेना जिंकू शकली असती  
युतीशिवायही आम्ही लोकसभेत जिंकू शकलो असतो, पण समविचारी असतानाही वेगळे लढलो असतो तर केंद्रात आमच्या डोक्यावर पुन्हा नको ते लोक येऊन बसले असते. ही बाब टाळण्यासाठी भाजपसोबत पुन्हा युती केल्याचे स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी यांनी या वेळी दिले. दरम्यान, आपण आता शिवसेनेत पूर्वीप्रमाणेच निष्ठेने काम करू, असे या वेळी आमदार सोनावणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...