आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पाकिस्तानी, बांगलादेशींना अगोदर देशातून हाकला' मनसे अध्यक्ष राज ठाकरे, तर आणखी एक ठाकरे राजकारणात सक्रिय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भारतात बांगलादेशी मुसलमान आणि पाकिस्तानी मुसलमान घुसले असून त्यांना हाकलून लावले पाहिजे. यासाठी मी केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा देणार आहे. इतर देशांप्रमाणे भारतालाही कडक होणे गरजेचे आहे. यांना सरळ करणे आवश्यक आहे. आपण आज अनेक बॉम्बवर, ज्वालामुखीवर बसलो आहोत, कधी काय होईल याची कल्पना नाही. पोलिसांना बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांची माहिती आहे, त्यांना ४८ तासांसाठी मोकळा हात द्या, मग बघा काय करतील, असे सांगत राज ठाकरेचा रंग तोच आहे, तो बदलणार नाही. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे नाव न घेता त्यांच्यावर टीकाही केली. मनसेचे पहिले अधिवेशन गुरुवारी मुंबईतील नेस्को संकुलात पार पडले. अधिवेशनाचा समारोप राज ठाकरे यांच्या भाषणाने झाला. या वेळी राज ठाकरे यांनी नवा झेंडा आणि मनसेची नवी भूमिका यावर सविस्तर संभाषण केले.

मी रंग बदलून सरकारमध्ये जात नाही : राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले, मी मराठीही आहे आणि हिंदूही आहे. मी धर्मांतर केलेले नाही. मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून आणि हिंदूंना नख लावण्याचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन. आणि हे मी आत्ताच बोलतोय असे नाही तर वेळोवेळी बोललो आहे. त्या वेळी कोणी मी रंग बदलत असल्याचे म्हटले नाही. देशाशी प्रामाणिक असणारे मुसलमान आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, जावेद अख्तर, जहीर खान आमचेच आहेत. जावेद अख्तर यांनी म्हटले होते, उर्दू ही मुसलमानांची भाषा नाही. ती रिलिजनची नव्हे तर रिजनची भाषा आहे हे खरे आहे. जर उर्दू मुसलमानांची भाषा असती तर बांगलादेशातील मुसलमानांनी बंगाली भाषेसाठी बांगलादेशची मागणी केली नसती, असेही ते म्हणाले.

...म्हणून झेंडा बदलला

भाषणाच्या सुरुवातीला झेंडा आवडला का, असा प्रश्न करीत राज ठाकरे म्हणाले, २००६ मध्ये जेव्हा मनसेची स्थापना केली तेव्हा हाच झेंडा माझ्या मनात होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, मी तेव्हा ३६-३७ वर्षांचा होतो, माझ्या मागे सांगणारे कोणी नव्हते. परंतु नंतर सोशल इंजिनिअरिंगसाठी विविध रंग हवेत असे सांगितले गेले. शिवाजी महाराजांचाही झेंडा भगवा होता. त्यांच्यासारखे सोशल इंजिनिअरिंग कोणीही केले नाही. झेंडा आला तरी माझ्या डोक्यातून हा झेंडा जात नव्हता, त्यामुळे ५-६ वर्षांपूर्वी शिवजयंतीला मी हा झेंडा काढला. गुढीपाडवा, शिवजयंतीला हाच झेंडा वापरत आलो.


वर्षभरापासून पक्षासाठी हाच झेंडा करावा असा विचार येत होता आणि आता अधिवेशनाच्या निमित्ताने हा झेंडा काढला आहे. मी आत्ता बदललो नाही. हा निव्वळ योगायोग आहे. माझा मूळ डीएनए हाच आहे. या झेंड्यावर राजमुद्रा आहे त्यामुळे त्याचा मान ठेवा, हा झेंडा कुठेही पडता कामा नये. निवडणुकीसाठी पक्षाची निशाणी असणारा झेंडा असेल तोच वापरायचा, असेही राज ठाकरे यांनी या वेळी मनसैनिकांना बजावले.

सोशल मीडियात नेत्यांवर टीका नको 

आपले काही जण सोशल मीडियावर पक्षाच्या नेत्यांवर टीका करतात. तशी टीका यापुढे करू नये. काही अडचण असेल तर माझ्याकडे वा पक्षाच्या नेत्याकडे नाराजी व्यक्त करावी. सोशल मीडिया हे त्यासाठी माध्यम नाही. पुढे जर असे कोणी करताना आढळले तर त्या व्यक्तीला पदावरून बाजूला करेन. उत्तम काम करा आणि ते सोशल मीडियावर टाका, असेही राज ठाकरे यांनी या वेळी मनसैनिकांना बजावले.

राम मंदिर, ३७० च्या रागातून मोर्चे

राज म्हणाले, एनआरसीविरोधात आज मोर्चे का निघतायत? राम मंदिर आणि ३७० चा राग ते काढत आहेत. मात्र त्यांच्यामागे जे आपल्या देशातील लोक उभे आहेत त्यांना का मदत करायची? मोर्चाला मोर्चाने उत्तर देण्यासाठी बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना बाहेर काढण्यासाठी ९ फेब्रुवारीला मोर्चा काढणार. आज देशात उभे राहिलेले मोहल्ले हे देशाला त्रास देणार. उद्या जर युद्ध झाले तर सैन्याला बाहेरच्या नाही तर आतल्या शत्रूंशीच लढावे लागेल.

भाषणाची सुरुवात

माझ्या हिंदू बांधवांनो... मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात प्रथमच जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवांनो, भगिनींनो असे बोलून केली.

राज्यात मौलवींकडून कारस्थान, गृहमंत्री अमित शहा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून माहिती देणार

राज्यातील काही भागांमध्ये मौलवी जात आहेत. तेथे मोठे कट- कारस्थान शिजत आहे, अशी माझी माहिती आहे. तेथे पोलिसांनाही प्रवेश नाही. अशा काही ठिकाणांची माहिती मला मिळाली आहे. ही माहिती घेऊन मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

आरत्या आम्ही घरात करतो, त्याचा त्रास होत नाही

राज ठाकरे म्हणाले, प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. भोंगे लावून नमाज कशाला, असा प्रश्न करत राज म्हणाले, हिंदूंच्या सणांच्या विरोधात कुणी बंदी आणायचा प्रयत्न केला तेव्हा मनसेच उभी राहिली. रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलिस भगिनींवर हात उचलला तेव्हा त्याविरुद्ध मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होती. आमच्या आरत्या आम्ही घरात करतो, जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा. आम्हाला काही आक्षेप नाही, असेही राज म्हणाले.

व्यंगचित्रकार अमित ठाकरे राजकारणात...

जगविख्यात व्यंगचित्रकार तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता आणखी एक व्यंगचित्रकार आणि ठाकरे घराण्यातील पाती अमित ठाकरे यांचा अखेर गुरुवारी सक्रिय राजकारणात विधिवत प्रवेश झाला.

आम्ही रंग बदलला नाही : उद्धव ठाकरे

मुंबई : आम्ही भगवा खाली ठेवला नाही, रंग बदलला नाही. आमचा झेंडा भगवा आहे आणि अंतरंगही भगवे आहे, या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्या टीकेला उत्तर दिले. तसेच मित्रपक्षाने शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत जे वचन दिले ते मोडून मलाच खोटे ठरवल्याने वेगळा मार्ग स्वीकारला, असे स्पष्टीकरण भाजपची साथ सोडण्याबाबत दिले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या निमित्ताने त्यांचा गुरुवारी मुंबईतील बीकेसी येथे ११ ज्येष्ठ शिवसैनिकांकडून सत्कार करण्यात आला. उद्धव म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर मी एकही सत्कार स्वीकारला नव्हता. परंतु हा माझा नव्हे तर तुमचा सत्कार असल्याने मी स्वीकारला. तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी सोपवली त्यापासून मी पळ काढणार नाही. परंतु ही माझी वचनपूर्ती नाही तर त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे.

 

बातम्या आणखी आहेत...