आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माेदी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेचा विराेध; आचारसंहितेत प्रदर्शित झाल्यास खळ्ळखट्याक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित ‘पीएम मोदी’ हा चित्रपट आचारसंहितेच्या काळात प्रदर्शित झाल्यास त्याला विरोध करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन सर्वच पक्षांनी करणे अपेक्षित आहे. मात्र सत्ताधारीच आचारसंहिता पायदळी तुडवणार असतील तर हा गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेला खळ्ळखटॅक करावेच लागेल, असे थेट आव्हानच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिले आहे. 

 

 


यापूर्वी काँग्रेसनेही निवडणुकीच्या काळात ‘पीएम मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी देऊ नये, अशी भूमिका घेतली होती. यापूर्वीही सरकारी योजनांच्या प्रचारासाठी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि ‘पॅडमॅन’ या सिनेमांचा वापर करण्यात आल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. शिवाय या प्रचारकी थाटांच्या चित्रपटासाठी भाजपनेच पैसा उपलब्ध करून दिल्याचेही राज यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात सांगितले होते. या मुद्द्याचा उल्लेख करत मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात मोदींच्या जीवनावरील येऊ घातलेल्या या चित्रपटाला विरोध करण्याचे सूतोवाच केले आहे. शिवाय या चित्रपटातील गाणी जावेद अख्तर यांनी लिहिल्याचा उल्लेख चित्रपटाच्या पोस्टरवर असून खुद्द जावेद अख्तर यांनीच या चित्रपटासाठी आपण कोणतेही गीत लिहिले नसल्याचे ट्विटरद्वारे जाहीर केले होते. या मुद्द्याचाही समाचार मनसेने आपल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे घेतला आहे. सुप्रसिद्ध संवाद लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांचे या चित्रपटात कोणतेही योगदान नसतानाही निव्वळ समाजातील आणि चित्रपटसृष्टीतील नामवंत लोक मोदी यांच्यावरील सिनेमासाठी आपले योगदान देत असल्याचा समज या सिनेमाच्या माध्यमातून पडद्यामागील लोकांना जाणीवपूर्वक पसरवायचा आहे, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना या गलिच्छ प्रचाराचा जाहीर निषेध करत असल्याचे या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. हा चित्रपट येत्या ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून त्यानंतर अवघ्या सहा दिवसांत लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे.

 

 

चित्रपटात मोदींचा बालपणापासून आतापर्यंतचा काळ
विवेक ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित ‘पीएम मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या जीवनपटातील काही दृश्ये दाखवल्याने या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. मोदींच्या लहानपणापासून ते पंतप्रधान बनण्यापर्यंतचा कालावधी या चित्रपटाद्वारे दाखवण्यात आला आहे. मात्र हा चित्रपट म्हणजे निवडणूक प्रचाराचाच एक भाग असल्याचा आक्षेप मनसेने घेतला आहे. 

बातम्या आणखी आहेत...