आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरुपम यांच्या विधानावर मनसेचा आक्रमक पवित्रा, मनसे, काँग्रेसचे निरुपम पुन्हा आमनेसामने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उत्तर भारतीय लोक मुंबई चालवतात आणि त्यांनी काम बंद केले तर मुंबई ठप्प होईल, असे वादग्रस्त विधान करत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा प्रांतवादाला तोंड फोडले आहे. त्यावर मुंबई बंद करण्याची एवढी धमक होती, तर भारत बंदच्या वेळी आमच्या पाठिंब्याची भीक मागायला का आलात, असे प्रत्युत्तर मनसेने दिले आहे. शिवाय, श्वानरूपी निरुपमांची छबी असलेले पोस्टर्स सोशल मीडियावरून पसरवत मनसेनेही या मुद्द्याला हवा दिली आहे. परिणामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा पेटण्याचे संकेत मिळत आहेत. 

 

नागपुरात रविवारी झालेल्या उत्तर भारतीय नागरिकांच्या मेळाव्यात बोलताना संजय निरुपम यांनी नवा वाद निर्माण केला. एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधात आघाडी उघडली होती. त्या वेळी फेरीवाल्यांची बाजू घेऊन निरुपम यांनी मनसेला आव्हान दिले होते. त्या वेळी निरुपम यांच्या चिथावणीमुळेच मनसे कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचा आरोप मनसेने केला होता. या पार्श्वभूमीवर निरुपम यांनी नव्याने केलेल्या या वक्तव्यामुळे मनसेच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. 


मुंबई म्हणजे काँग्रेसचे कार्यालय नव्हे : देशपांडे 
निरुपमांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले, ऊठसूट बंद करायला मुंबई म्हणजे प्रदेश काँग्रेसचे कार्यालय नव्हे. निरुपम यांनी फक्त वल्गना करून नयेत तर एकदा खरोखरच मुंबई बंद करून दाखवावी. त्यांच्यात मुंबई बंद करण्याची धमक आहे, तर भारत बंदच्या वेळी आमच्याकडे पाठिंब्याची भीक मागायला का आले होते, याचेही त्यांनी उत्तर द्यावे, असे आवाहनही देशपांडे या वेळी बोलताना केले.

 
निरुपम यांच्या विरोधात मनसेची मीडियावर पोस्टरबाजी 
निरुपम यांच्या वक्तव्याचा निषेध करतानाच मनसेने त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्टरबाजी सुरू केली आहे. बांद्रा येथील मनसेचे विभागाध्यक्ष अखिल चित्रे यांनी निरुपम यांच्या निषेधार्थ तयार केलेल्या पोस्टरवर निरुपम यांना श्वानरूपात दाखवले असून त्यांच्या शेजारी उत्तर भारतीय मतांच्या रूपाने असलेल्या हाडांची टोपली दाखवण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...