Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Mob attacks on police; 19 people were arrested, 1 policeman, 2 young injured

वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; १९ जण अटकेत, २०० वर गुन्हा दाखल, दगडफेकीत १ पोलिस गंभीर, २ तरुण जखमी

प्रतिनिधी, | Update - Jun 17, 2019, 10:40 AM IST

रात्रभर सर्च ऑपरेशन, गावात तणाव, संशयित बेपत्ता

 • Mob attacks on police; 19 people were arrested, 1 policeman, 2 young injured

  जळगाव - जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथे दोन गटांत सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावरच जमावाने तुफान दगडफेक केली. दगडफेक करण्यात महिलांचाही सहभाग होता. यात एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी तर जमावातील दोन तरुण जखमी झाले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात २०० जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील १९ जणांना अटक करण्यात आली आहे.


  आसोदा येथील सरपंच नबाबाई दौलत बिऱ्हाडे यांचा मुलगा संजय हा शनिवारी सायंकाळी ७ वाजता पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे पंपावर काम करणाऱ्या अमोल गोपाळ कोळीसोबत वाद झाला. या वादाचे पर्यवसान रात्री दंगलीत झाले.


  रात्री ९.३० वाजता आसोदा गावातील वाल्मीकनगर, धनजीनगर या भागात जमाव जमला होता. बिऱ्हाडे व कोळी यांनी समाजातील लोकांना बोलावून घेत वाद वाढवला. त्यानंतर दोन्ही गट हातात लाठ्या-काठ्या घेऊन एकमेकांवर चालून आल्याने गावात तणाव निर्माण झाला. दोन्ही गटांच्या हल्ल्यात पवन अरुण सोनवणे व राहुल दिलीप सोनवणे हे दोघे जखमी झाले. पोलिस पाटील आनंदा बिऱ्हाडे यांनी ही माहिती पोलिसांना फोनवरून दिली. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक कदीर तडवी, अरुण सोनार यांचे पथक आसोद्याला रवाना झाले. दोन्ही गटांतील सुमारे २०० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला.

  रात्रभर सर्च ऑपरेशन, गावात तणाव, संशयित बेपत्ता
  जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे हे प्रकरण चिघळले होते. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरी जमावाने पोलिसांना टार्गेट केले. त्यामुळे गांभीर्याने घेऊन हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शनिवारी रात्रभर पोलिसांनी आसोदा गावात शोधमोहीम सुरू केली. रविवारी दुपारपर्यंत १९ जणांना अटक करण्यात आली होती. यातील दोन अल्पवयीन मुले आहेत. गावात शांतात प्रस्थापित राहावी यासाठी अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, पोलिस उपअधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी शनिवारी रात्रीच आसोदा येथे जाऊन चौकशी केली.

Trending