आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्राचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्यास नागरिकांनी चोप देत केले पोलिसांच्या हवाली

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लूटमारीचे प्रकरण नाही- पोलिसांचा दावा

औरंगाबाद- वडगाव कोल्हाटी शिवारातील वरद इंडस्ट्रीजमध्ये १२ फेब्रुवारी रोजी प्रवेश करत चोरट्यांनी तब्बल सात लाखांच्या ऐवजावर हात साफ केला. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी सिडको वाळूज महानगर-१ परिसरातील पाटलीपुत्र हाउसिंग सोसायटीमधील घरात प्रवेश करत चोरट्यांनी १ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.


या दोन्ही घटनांमधील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांना आव्हान देत चोरट्याने पुन्हा एकदा सिडको वाळूज महानगरात दिवसाढवळ्या चोरी करून सव्वा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली. विशेष म्हणजे चोरीची घटना घडल्यानंतर तिसऱ्या दिवशी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता दोघा संशयितांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत एका कामगाराचा मोबाइल लुटला, तर अन्य एकावर हल्ला चढवत त्यास मारहाण केली. या वेळी मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनी कामगारांची सुटका करत लूटमार करणाऱ्या आरोपींना चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.


वरद इंडस्ट्रीमध्ये चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही अद्याप चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. दरम्यान, पुन्हा चोरट्यांनी सिडको पाण्याची टाकी परिसरातील बंद घरात प्रवेश करत रोख रक्कम व किमती ऐवज लंपास केला. या दोन्ही घटनांना घडून अवघ्या दोन आठवड्यांचा अवधी होत नाही तोच पुन्हा चोरट्याने सिडको येथील रहिवासी दगडू मनोहर मोगल यांच्या घराचे कुलूप तोडून रोख ३० हजार व १ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.

लूटमारीचे प्रकरण नाही

चाकूचा धाक दाखवून लूटमार असे प्रकरण नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तसे निदर्शनास येत नाही. दुसरे जे प्रकरण आहे ते मारामारीचे आहे. त्यात दगड फेकून मारला आहे. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मोबाइल काढून घेतलेली व्यक्ती फिर्याद देण्यासाठी अद्याप पुढे आलेली नाही. येताच गुन्हा दाखल करण्यात येईल. मधुकर सावंत, वाळूज एमआयडीसी, पोलिस निरीक्षक

दगड मारून केले जखमी

जयभवानी चौक ते कोलगेट चौकदरम्यान असणाऱ्या रस्त्याने ये-जा करणाऱ्या एका कामगारास दोघा तरुणांनी अडवून शस्त्राचा धाक दाखवत मोबाइल हिसकावला. पुढे याच तरुणांनी दुसऱ्या एका तरुणास धाक दाखवत पैशाची मागणी करत मारहाण केली. दरम्यान, पैसे देण्यास नकार देताच त्यास दगड मारून जखमी केल्याची माहिती रहिवाशांनी दिली. नशेत असणाऱ्या तरुणांकडून धमकावत लूटमार होत असल्याने त्यांना चोप देण्यास सुरुवात केली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांना ताब्यात घेतले.


शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास जयभवानी चौक ते कोलगेट चौकदरम्यान नशेत असणाऱ्या आरोपींनी धुमाकूळ घातल्याने मोठ्या संख्येत बघ्यांची गर्दी उसळली होती. याच संधीचा फायदा घेत अनेकांनी आरोपींवर हात साफ करून घेतले.

बातम्या आणखी आहेत...