आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षापासून पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोबाइलला बंदी,फोटोसेशन करणाऱ्यांना दणका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरक्षेच्या कारणामुळे समितीने घेतला निर्णय

पंढरपूर-  श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नवीन वर्षापासून अर्थात १ जानेवारी २०२० पासून भाविकांना मोबाइल नेण्यास बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील उर्फ विठ्ठल जोशी यांनी दिली.

यासंदर्भात माहिती देताना जोशी यांनी सांगितले की, मंदिर समितीच्या सदस्यांची सोमवारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखील बैठक झाली. बैठकीला नगराध्यक्षा साधना भोसले, शंकुतला नडगिरे, प्रकाश महाराज जवंजाळ, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजी महाराज मोरे आदी सदस्य तसेच व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि मंदिरातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

प्रामुख्याने विठ्ठल मंदिराची सुरक्षितता विचार घेऊन आणि त्याबरोबरच भाविकांकडून मंदिरात मोबाइलवर सेल्फी काढणे, अरुंद  गाभाऱ्यात विठ्ठल-रुक्मिणीसमवेत फोटो काढणे, याबरोबरच एखाद्या पर्यटनस्थळाप्रमाणे वेगवेगळ्या पोज घेऊन अनेक उत्साही भाविक विशेषत: तरुण मंडळी मंदिरात फोटोसेशन करतात. यामुळे सुरक्षा कर्मचारी आणि अशी उत्साही मंडळी यांच्यात सतत वादविवादाच्या घटना घडत होत्या. त्याबरोबरच अलीकडच्या काळात विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते विठ्ठलाच्या पायावर निवेदने ठेवून विविध आंदोलने करताना दिसत होती. त्यामुळे अशा आंदोलनकर्त्यांकडूनही विठ्ठलासमवेत फोटो काढण्याचे प्रस्थ वाढलेले होते. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य अबाधित राहावे तसेच अशा गोष्टींना पायबंद बसावा यासाठी मंदिरात मोबाइल नेण्यास बंदी करण्याचा ठराव संमत करण्यात आला. 

मंदिरावर सध्या असलेला ध्वजस्तंभ अतिशय जुना झालेला असून या ध्वजस्तंभाचे लाकूड कुजलेले आहे. त्यामुळे हा ध्वजस्तंभ केव्हाही कोसळू शकतो. हा स्तंभ पडल्यास त्यामुळे कोणाला इजा होऊ नये म्हणून सध्याचा स्तंभ काढून त्या ठिकाणी नवीन ध्वजस्तंभ बसवण्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

मंदिरातील सभामंडप तसेच बाजीराव पडसाळीमध्ये सध्या अनेक महाराज मंडळींकडून हरिनाम सप्ताहांचे आयोजन करण्यात येत असते. हे सप्ताह होत असताना मंदिरात ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) लावण्यात येत असतो. 

ध्वनिक्षेपक लावण्यासदेखील मज्जाव
ध्वनिक्षेपकामुळे मंदिरात ध्वनिप्रदूषण होते. मंदिरातील शांतता भंग पावते. त्यामुळे यापुढे मंदिरात होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या वेळी ध्वनिक्षेपक लावण्यासदेखील मज्जाव करण्यात येणार आहे. याबाबतचाही निर्णय आजच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. त्यामुळे ध्वनिक्षेपकाशिवाय आयोजकांना अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करावे लागणार आहे.  दरम्यान, मंदिर समितीने मोबाइल मंदिरात नेण्यास बंदी घातल्याच्या निर्णयाचे अनेक संघटनांनी स्वागत केले आहे, तर  काही तरुण मंडळींनी याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे पहायला मिळाले आहे. 

सोपान महाराजांच्या नातेवाइकांना मदत   
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यासाठी निघालेल्या नामदेव महाराज पालखी सोहळ्यात दिवे घाटात जेसीबी घुसून झालेल्या अपघातात येथील नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज नामदास आणि बुलडाणा जिल्ह्यातील अतुल महाराज आळशी हे दोघे ठार झाले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून या दोघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मदत देण्याचादेखील निर्णय आज घेण्यात आला. मदतीचे धनादेश नामदास आणि आळशी कुटुंबीयांकडे लवकरच सुपूर्द केले जाणार असल्याची माहितीही जोशी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...