आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीच्या मोबाइलचे आयएमईआय क्रमांक बदलून करायचे विक्री; पावणेसात लाख रुपयांचे ६८ मोबाइल केले जप्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - चोरीच्या मोबाइलचे आयएमईआय क्रमांक बदलून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा दरोडा प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला. या प्रकरणी शनिवारी रात्री माजलगावातून ३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून पावणेसात लाखांचे तब्बल ६८ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.


बीड शहरातील मोबाइल चोरटे व त्यांचे माजलगावातील अन्य साथीदार मिळून मोबाइल चोरुन व त्याचे आयएमईआय क्रमांक बदलून या मोबाइलची विक्री करत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दरोडा प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. पथकाने याचा शोध घेतला असता बीडमधील मोबाइलचोर गर्दीच्या, यात्रेच्या ठिकाणी जाऊन महागडे मोबाइल चोरी करत असे व हे मोबाइल आयएमईआय बदलण्यासाठी माजलगावातील मित्राच्या मोबाइल शॉपीत देत असे. आयएमईआय क्रमांक बदलून हा मित्र आपल्या मोबाइल शॉपीतून या मोबाइलची विक्री करत होता. शनिवारी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक विजय कबाडे, अंबाजोगाई विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, भारत बंड, मुन्ना वाघ, अशोक दुबाले, महेश भागवत, दिलीप गिते, मुंजाबा सौदरमल यांनी माजलगावातून  मतीन हनिफ शेख (२५), जुबेर इसाक शेख (३४, दोघे रा. फुलेनगर, माजलगाव) व मोहसीन इसाक शेख (२६, रा. अशोकनगर, माजलगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ६८ मोबाइल व संगणकासह इतर साहित्य जप्त केले. 


या प्रकरणात इतरही काही जणांचा सहभाग असून पथक त्यांचा शोध घेत आहे. किती जणांना हे मोबाइल विकले. एका आयएमईआयचे चार मोबाइल असे प्रकार असून या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...