आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफीसच्या घाईत चोरटा करायचा मोबाइल चोरी, 19 वर्षीय चोरट्याकडून 12 मोबाइल केले जप्त 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - गाडगेनगर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी एका १९ वर्षीय मोबाइल चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत चोरीचे बारा मोबाइल जप्त केले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व मोबाइल त्याने सकाळी दहा ते अकरा वाजताच्या सुमारास घरात जाऊन चोरी केले आहे. यावेळी बहुतांश घरातील व्यक्तींना ऑफीस किंवा कामावर जाण्याची घाई राहते. याच संधीचा फायदा हा चोरटा उचलतो आणि घरात जाऊन मोबाइल चोरत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

 

वैभव नारायण आडोळे (१९, रा. येरला, मोर्शी) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. वैभवला पाच वर्षांपूर्वी राजापेठ पोलिसांनी पहिल्यांदा पकडले होते. त्यावेळी तो जेमतेम चौदा वर्षाचा होता. त्याने त्याचवेळी एका घरातून मोबाइल व लॅपटॉप चोरून आणला होेता. मात्र तेव्हापासून त्याचे चोरीचे सत्र सुरू झाले ते अजूनही सुरूच आहे. मध्यतंरी पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या दुचाकीसुद्धा जप्त केल्या होत्या. मोबाइल व लॅपटॉप चोरीमध्ये तो आता सराईत झाला आहे. शहरात चोरी करून पैसा आल्यानंतर तो सहा महिन्यांपूर्वी गोव्याला गेला होता. त्याठिकाणी तो एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने गोव्यातही हात मारला का? याबाबत गाडगेनगर पोलिस माहिती घेत आहे. त्याचे चोरीचे लक्ष्य बहुतांश मोठे घर आहेत. कारण मोठ्या घरात सकाळी दहा ते अकरा वाजताच्या सुमारास घरातील मंडळी तयारी करण्यासाठी आतमध्ये असतात. यावेळी हॉलमध्ये मोबाइल चार्जिंगला लागलेला असतो. हीच संधी तो साधतो, असे पोलिसांनी सांगितले आहे. 

 

उपचारासाठी गरज सांगून करायचा मोबाइल विक्री 
वैभवने आतापर्यंत चोरलेले बहुतांश मोबाइल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विकले आहेत. माझ्या आईची किंवा भावाची प्रकृती ठिक नाही, त्यांच्या उपचारासाठी मला पैश्याची गरज आहे, असे सांगून तो दोन, तीन हजार रुपयात महागडा स्मार्ट मोबाइल विक्री करतो. एखाद्यावेळी मोबाइल विकल्या गेला नाही तर गहान ठेवायचा आणि पैसे घेऊन पसार व्हायचे, अशी चोरीच्या मोबाइलची विल्हेवाट लावण्याची त्याची पद्धत असल्याचे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी सांगितले आहे. 

बातम्या आणखी आहेत...