आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात दिव्यांग मतदारांसाठी मोबाइल व्हीलचेअर व्हॅनची सोय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतुल पेठकर

नागपूर - लोकसभा निवडणुकीपासून दिव्यांग मतदारांचे मतदान वाढावे यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्पसह इतर व्यवस्था करण्यात येतात. तसेच त्यांना घरापासून मतदान केंद्रापर्यत ने-आण करण्याची व्यवस्थाही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येते. उपराजधानीतील निवृत्त वैज्ञानिक प्रकाश अंधारे व त्यांचे मित्र विजयकुमार बथ्थड यांनी २१ आॅक्टोबर रोजी मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी आपल्या माेबाइल व्हीलचेअर व्हॅन दिल्याची माहिती पीडब्ल्यूडीचे दिव्यांग विभागाचे नोडल अधिकारी अभिजित राऊत यांनी “दिव्य मराठी’ला दिली. जयप्रकाशनगर येथे राहणारे निवृत्त वैज्ञानिक प्रकाश अंधारे व त्यांचे मित्र विजयकुमार बथ्थड यांनी तीन व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत, तर रिलिफ अलाइड सर्व्हिसेसने किमान ५०० पायऱ्या सहज चढून जाता येईल अशी अत्याधुनिक खुर्ची दिली आहे. यामुळे दिव्यांग मतदारांना ने-आण करणे खूपच सोपे झाल्याचे सांगितले.

प्रकाश अंधारे हे निवृत्त वैज्ञानिक दिव्यांग आहेत. त्यांनी मारुती वॅगनआर या गाडीला माॅडिफाइड करून हवे तसे बदल करून घेतले. गाडीतील मागच्या सीट्स काढून टाकल्या. तसेच डिक्कीत सुमारे ९ फूट लांब सहज मोडता येईल (फोल्डेड) असा रॅम्प करून घेतला. गाडीत चढता उतरताना हा रॅम्प गाडीला जोडला की त्यावरून व्हीलचेअर सहज चढवता व उतरवता येते, असेही  त्यांनी या वेळी सांगितले.
 

आधुनिकीकरणासठी अडीच लाखांचा खर्च
रॅम्प नसलेल्या ठिकाणी या रॅम्पचा उपयोग करून दिव्यांग मतदाराला नेता येते, असे अंधारे यांनी सांगितले. माॅडिफिकेशनसाठी २ ते २.५० लाख खर्च आल्याचे अंधारे यांनी सांगितले.  दिव्यांग मतदारांना या आधुनिक वाहनांचा फायदा होणार आहे.
 
 

एक खुर्ची सव्वा लाख रुपयांची
शहरातील व्यावसायीक राजेश पारीख यांनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनावरून सुमारे ५०० पायऱ्यापर्यंत दिव्यांग मतदाराला सहज ओढून नेता येईल अशी अत्याधुनिक खुर्ची उपलब्ध करून दिली आहे. सव्वा लाख रुपयांची ही एक खूर्ची आहे. खूर्चीला रणगाड्याला असतो तसा सरकत्या चाकांचा पट्टा असतो. ही खूर्ची १२ व्होल्टच्या बॅटरीवर चालते. पायऱ्यांच्या कठड्याला सरकत्या चाकांचा पट्टा जोडला की बॅटरी सुरू करायची. त्या नंतर एक प्रशिक्षित कर्मचारी किमान ५०० पायऱ्यांपर्यत दिव्यांगाला सहज ओढू शकतो. यात कर्मचाऱ्यावर अजिबात वजन पडत नाही, अशी माहिती पारेख यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...