आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांची महाआघाडी अभद्र, विराेधी आघाडीतील नेते स्वअस्तित्व टिकवण्यासाठी भांडताहेत; माेदींची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- केंद्रातील भाजप सरकारला सत्तेवरून खेचण्यासाठी होऊ घातलेली विरोधकांची महाआघाडी म्हणजे अभद्र आघाडी आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. महाआघाडीतील सर्व सहभागी घटक पक्षातील नेते स्वअस्तित्व टिकवण्यासाठी लढाई करत आहेत, असे मोदी यांनी स्पष्ट केले. 

 

तमिळनाडूत मोदींनी रविवारी भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. तेलुगू देसम पार्टीने महाआघाडीसाठी प्रयत्न केले आहेत. हा पक्ष काँग्रेसचा एकेकाळी शत्रू होता. आता तोच काँग्रेसशी हातमिळवण्याच्या प्रयत्नात आहे. महा आघाडीतील काही पक्ष राम मनोहर लोहिया यांच्या पासून प्रेरित आहेत. मात्र लोहियांनी स्वत: मात्र काँग्रेसला कायम तात्त्विक विरोध दर्शवला होता. सध्या अनेक नेते महाआघाडीसाठी बोलू लागले आहेत. खरे तर या आघाडीतील प्रत्येक नेता स्व अस्तित्त्वासाठी संघर्ष करू लागला आहे. ही आघाडी म्हणून वैयक्तिक संघर्षाची आघाडी आहे. त्यात लोकांच्या आकांक्षांचा समावेश नाही, असा आरोप मोदींनी केला. काँग्रेस म्हणजे ‘तडजोड करणारी पार्टी’ आहे, असे लोहियांना वाटत असे. अर्थात तत्त्वासंबंधीचे मुद्दे असो की राष्ट्रहिताचे प्रश्न असतील. दोन्हीही बाबतीत काँग्रेसने नेहमीच तडजोडीचे धोरण मांडले. त्याला लोहियांचा विरोध होता. त्याशिवाय या आघाडीतील अनेक नेत्यांना आणीबाणीत अटक झाली होती. त्यांचा छळ झाला होता, याचीही मोदींनी आपल्या भाषणातून आठवण करून दिली.

 

२०१८ चांगले वर्ष
माझ्यादृष्टीने २०१८ हे देशासाठी अतिशय चांगले वर्ष ठरले. देशासाठी अनेक चांगल्या योजना लागू करण्यात सरकारला यश मिळाले. त्याचा लाभ दिसून आला, याचा आनंद वाटतो, असे माेदींनी सांगितले. 

 

एनटी रामाराव यांचा उद्देश आता धुळीस मिळाला
दिवंगत नेते एनटी रामाराव यांनी काँग्रेसपासून आपली जनता मुक्त ठेवण्यासाठी व तेलुगू लोकांच्या सन्मानासाठी तेलुगू देसम पार्टीची स्थापना केली होती. परंतु आता हा पक्ष काँग्रेससोबत युती करण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणूनच आंध्र प्रदेशातील जनता ही गोष्ट कशी स्वीकारू शकेल, असा प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातही एक पक्ष काँग्रेसच्या विरोधात स्थापन झाला होता, असे सांगून मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नामोल्लेख न करता टीका केली.


काँग्रेसने मुलायम यांचा छळ केल्याचे सर्वांनाच ठाऊक
भ्रष्टाचारी व गुन्हेगारी मानसिकतेचे लोक प्रशासनात सर्वोच्च स्थानी असल्यावर काही होतेच. मुलायमजी (सपा नेते मुलायम सिंग यादव) यांचा काँग्रेसने कसा छळ केला हे सर्वांनाच ठाऊक आहे. असे पक्ष लोहियांच्या विचारांना खऱ्या अर्थाने न्याय देत आहेत असे वाटते ? अर्थातच त्याचे उत्तर नाही, असे म्हणावे लागेल, असे ते म्हणाले.

 

आघाडी लोकांच्या आकांक्षांची नव्हे पैशांची
स्वअस्तित्वासाठी महाआघाडीचे नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे आघाडीत लोकांच्या आकांक्षा दिसून येत नाहीत. कोणतेही तत्व असलेले नेते त्यात सहभागी झालेले दिसत नाहीत. त्यामुळेच ही आघाडी केवळ सत्ता असलेल्या नेत्यांची आघाडी आहे. जनतेचा या आघाडीशी संबंध नाही, अशी टीका मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलताना केली. 

बातम्या आणखी आहेत...