आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांबूच्या राख्यांना महिलांची नावे, मोदी ब्रँड अॅम्बेसेडर; मेळघाटातील ७ गावांतील ५० कारागिरांनी केली सव्वा लाख बांबू राख्यांची निर्मिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर  -  अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रातर्फे गेल्या पाच वर्षांपासून बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या जात आहेत. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या हातावर पर्यावरण पूर्वक राखीचे सृष्टीबंधन बांधण्यात आले होते. त्यामुळे या राख्या खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी राख्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मोदींचे छायाचित्र वापरून राखी विक्रीचे पोस्टर तयार करण्यात येणार असून, या राख्या तयार करणाऱ्या कोरकू आदिवासी महिलांची नावेच त्यांना देण्यात आल्याची माहिती संपूर्ण बांबू केंद्राचे संचालक सुनील देशपांडे यांनी “विव्य मराठी’ला दिली. 


मेळघाटची नवी ओळख म्हणून पुढे येत असलेल्या बांबू राखीला प्रोत्साहन मिळावे, या करिता महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या सहकार्याने  विदर्भातील नागपूर, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, आणि पुणे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक अशा चार मोठ्या शहरांमध्ये “राखी महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये बांबूपासून निर्मिती केलेल्या वेगवेगळ्या आकारातील, डिझाईनच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध असतील, अशी माहिती देशपांडे यांनी या वेळी दिली.

 
पर्यावरणाची हानी टळते, रोजगार निर्मिती होते : मेळघाटमधील सात गावांमधील सुमारे ५० कारागिरांनी तब्बल सव्वा लाख बांबू राख्या तयार केल्या आहेत. या राख्या पर्यावरणपूरक आहे. प्लास्टिक, थर्माकोल वा इतर वस्तूंपासून निर्मित राख्यांमुळे पर्यावरणाची हानी होते. या राख्यांमुळे आदिवासींना रोजगारही उपलब्ध होतो, असे देशपांउे यांनी सागितले. .

 

विदेशींनाही भुरळ, ३५ देशांत पाठवल्या जाणार राख्या
मेळघाटातील आदीवासींनी तयार केलेल्या या सुबक राख्यांनी विदेशींनाही भुरळ घातली आहे. सलग दुसऱ्या वर्षी या राख्या सातासमुद्रापार जाणार आहेत. मेळघाटच्या गावांमधील आदिवासी महिलानी तयार केलेल्या बांबू राखी विदेशात पाठवण्यासंदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे.  केंद्र सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) या केंद्र सरकारच्या संस्थेतर्फे आदिवासी महिला-पुरुषांनी तयार केलेल्या बांबू राखी जगभरातील ३५ देशात पाठविल्या जाणार आहे.