आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - दिल्ली निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी तीन दिवस बाकी असतानाच जाहीर सभांच्या संख्येत वाढ झाली आहे. ट्विटरच्या माध्यमातून हल्ले वाढले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. प्रिय पंतप्रधान, अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तुम्ही जबाबदारी कशी झटकता येऊ शकेल यावर मंथन करावे. तुम्ही निर्मलाजींनी सादर केलेल्या बेकार बजेटचा खुशाल आधार घ्यावा. त्यांना निलंबित करा आणि त्यांना दोषी ठरवा. समस्येची सोडवणूक होईल, असा टोला राहुल यांनी लगावला.
भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शाहीन बाग प्रकरणात ट्विट केले. ते म्हणाले, केजरीवालजी तुम्ही काम केले असते तर ही वेळ आली नसती. आधी जामिया व सीलमपूरमधील गर्दीला चिथावणी दिली. न्यू फ्रेंड्स कॉलनीत जाळपोळ व दगडफेक केली. त्यानंतर शाहीन बागेत धरणे आंदोलन झाले. तेथे आपल्या कार्यकर्त्याकडून गोळीबार करून घेतला. मोदी व शहा यांना पराभूत करण्यासाठी दिल्लीला पेटवून द्याल का? दुसरीकडे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून अमित शहा यांना मुद्यांवर चर्चेचे निमंत्रण दिले आहे.
दिल्लीची जनता शाहीनबाग नव्हे, देशासाेबत : अमित शहा
दिल्लीची जनता शाहीनबाग नव्हे, तर देशासाेबत आहे. दिल्लीतील जनता नागरिकत्व कायद्याच्या विराेधात शाहीनबागमध्ये आंदाेलन करत असलेल्या लाेकांसाेबत नव्हे, तर देशासाेबत खंबीरपणे उभी आहे. केजरीवाल व राहुल यांनी ही गाेष्ट लक्षात घेतली पाहिजे. शाहीनबाग सारख्या प्रश्नावर राजकारण करता कामा नये, असे शहा यांनी सांगितले. कँट मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनीष सिंह व पटेलनगरमधून परवेश रतन, तिमारपूरचे सुरेंद्र सिंह बिट्टू यांच्या प्रचारासाठी बुधवारी शहा यांनी सभा घेतली. त्यात तेे बोलत होते.
केजरीवालांच्या मुलीचे भाजपला उत्तर - हे घाणेरडे राजकारण
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी संबोधल्याच्या प्रकरणात त्यांची मुलगी हर्षिता यांनी भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांच्यावर टीका केली. हर्षिता लिहितात- हे घाणेरडे राजकारण. माझे वडील नेहमी सामाजिक सेवेत सक्रिय राहिले. ते आम्हाला सकाळी ६ वाजता उठवत. भाऊ, आई आणि आजी-आजोबा यांना भगवद्गीतेबद्दल सांगत असत. आरोग्य सुविधा लोकांसाठी मोफत करणे दहशतवाद आहे? मुलांना शिक्षण देणे दहशतवाद आहे?
लोकशाही : दिल्लीत शंभरी गाठलेले १४७ मतदार
दिल्लीत १ कोटी ४७ लाख ८६ हजार ३८२ मतदार आहेत. त्यापैकी १४७ मतदारांनी शंभरी गाठली आहे. सर्वात वृद्ध मतदार म्हणून कैलाश कालीतारा मंडल यांची नोंद आहे. त्यांचे वय ११० वर्षे आहे. दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंह यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. ते म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत पुरुष मतदारांची संख्या ८१ लाख ५ हजार २३६ तर ६६ लाख ८० हजार महिला मतदार आहेत. सेवेशी संबंधित ११ हजार ६०८ व तृतीयपंथी-८६९ मतदार आहेत. ऐंशी वर्षीय किंवा त्यापेक्षा जास्त २ लाख ४ हजार ८३० तर दिव्यांग मतदार ५० हजार ४७३ आहेत. १३ हजार ५७१ केंद्रे आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.