आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपसाेबत सत्तेची माेदींकडूनही ऑफर, मात्र मी ती धुडकावली; कारण...- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा गाैप्यस्फाेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • असे केले सोनियांना राजी : इंदिरा-बाळासाहेबांचे उदाहरण
  • असे केले उद्धवांना राजी : ‘ठाकरी’ भाषेत आदेश

मुंबई - ‘पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मला महाराष्ट्रात एकत्र येऊन काम करण्याची आॅफर दिली हाेती, मात्र मी ती धुडकावली,’ असा गाैप्यस्फाेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साेमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. मला माेदींची नव्हे, तर अमित शहांची चिंता हाेती. त्यांच्यापासून मी सावध हाेताे. आमची बुद्धिमत्ता, आक्रमकता व जनाधारामुळे अमित शहांचा डाव महाराष्ट्रात फसला,’ असेही पवारांनी स्पष्ट केले.

पुतणे अजित पवार यांच्या बंडाच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, ‘अजित पवार एक दिवस मला बोलले की देवेंद्र फडणवीस मला बाेलावत आहेत. त्यांना काही बाेलायचे आहे. राजकारणात सर्वपक्षीयांशी संवाद असायलाच हवा, असा विचार करून मी अजित पवार यांना फडणवीसांना भेटण्याची परवानगी दिली. मात्र, अजित यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितले की, ‘तुम्ही आजच शपथविधी करणार असाल तर मी काहीही करू शकताे.’ शेवटी दोघांनीही मंत्रिपदांची शपथ घेतली.  ताे असे पाऊल उचलेल, असा मी विचारही केला नव्हता. त्याच्या भूमिकेला माझा पाठिंबा हाेता, ही चर्चा पूर्णत: चुकीची आहे. मला सकाळीच फडणवीस व अजित यांच्या शपथविधीची बातमी कळली तेव्हा धक्काच बसला. त्या वेळी आमचे काही आमदारही अजित पवारांसाेबत उपस्थित असल्याचे कळले. त्यांची नावे माहीत करून घेतली, तेव्हा विश्वास हाेता की माझ्या शब्दाचा मान ठेवून ते परत येतील. तसेच महाविकास आघाडीचे सरकार प्रभावी ठरेल, याचाही विश्वास हाेता. पंतप्रधान, राष्ट्रपती व राज्यपाल किती तत्परतेने काम करतात, हेही या घटनेच्या निमित्ताने कळून चुकले. सकाळी ६ वाजता या घडामाेडी झाल्या, हे एेकून माझा तर विश्वासच बसला नव्हता.’

असे केले साेनियांना राजी : इंदिरा-बाळासाहेबांचे उदाहरण

1. मी साेनियांना आठवण करून दिली की, आणीबाणीत बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. नंतरच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसविरुद्ध आपला उमेदवारही दिला नव्हता.


2. राष्ट्रपतिपद निवडणुकीतही प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी या काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा दिला. 

असे केले उद्धवांना राजी : ‘ठाकरी’ भाषेत आदेश

शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असा बाळासाहेबांना शब्द दिला आहे. ही माझी जबाबदारी आहे, असे उद्धव ठाकरे वारंवार सांगत होते.  मुख्यमंत्रिपदासाठी ते अजिबात तयार नव्हते. मात्र, नव्या सरकारचा कारभार सुरळीत चालण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनणे गरजेचे होते. तिन्ही पक्षांची उद्धव यांच्या नावाला सहमती होती. उद्धव तयारच नव्हते. मी त्यांना त्यांच्या भाषेत मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचे आदेश दिले. त्यानंतर ते राजी झाले, असे शरद पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...