Home | National | Other State | Modi goes from south to north, 8 public meeting in 3 days in 8 states 

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकात पंतप्रधानांच्या प्रचारसभा; मोदी ईशान्येतून दक्षिणेत दाखल, तीन दिवसांत ८ राज्यांत ८ सभा!

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Feb 11, 2019, 10:25 AM IST

चंद्राबाबू नायडूंच्या निर्णयाचा मोदींनी आपल्या भाषणातून चांगलाच समाचार घेतला.

 • Modi goes from south to north, 8 public meeting in 3 days in 8 states 

  चेन्नई /बंगळुरू / गुंटूर- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचारसभा आणि नवीन प्रकल्पांचा धडाका लावून दिला आहे. ईशान्येकडील राज्यांच्या भेटीनंतर रविवारी ते दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकात पोहोचले. सर्वात आधी आंध्र प्रदेशातील गुंटूरला ते पोहोचले. येथील विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी आंध्र सरकारमधील एकही मंत्री हजर नव्हता. प्रोटोकॉलअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री किंवा मंत्र्याने विमानतळावर येण्याचा संकेत असतो. परंतु नायडूंनी हा संकेत मोडला. गेल्या तीन दिवसांत मोदींनी ८ राज्यांत ८ जाहीर सभा घेतल्या.

  रालोआतून बाहेर पडून महाआघाडीत सहभागी होण्याच्या चंद्राबाबू नायडूंच्या निर्णयाचा मोदींनी आपल्या भाषणातून चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, टीडीपीचे प्रमुख पक्ष बदलण्यात खूप वरिष्ठ आहेत. एनटीआरने काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र टीडीपीची स्थापना केली होती. नायडूंनी सासरे एनटीआर यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आंध्रातील जनतेने आता जागे होण्याची वेळ आली आहे. हे (नायडू) भाजप कार्यकर्त्यांच्या पैशांवर कार्यक्रम करतील. दिल्लीत जाऊन फोटो काढण्यासाठी ते मोठी रॅलीही काढणार आहेत. पण हा आंध्रच्या जनतेच्या तिजोरीवरील डल्ला आहे. तुम्ही त्यांच्याकडे हिशेब मागितला पाहिजे.

  आम्ही आंध्रसाठी विशेष पॅकेज बनवले :

  आम्ही आंध्र प्रदेशला विशेष दर्जाला दिल्या जाणाऱ्या सुविधेसारखा निधी दिला. विशेष पॅकेज बनवले. सप्टेंबर २०१६ मध्ये ते लागू केले. चंद्राबाबूंनी त्याबद्दल आभारही मानले होते. आम्ही आमचे वचन पाळत होतो. पण त्याच्या अंमलबजावणीत टीडीपी सरकार अपयशी ठरले. पॅकेजअंतर्गत केंद्रीय मंत्रालयांनी ३ लाख कोटींची मदत मंजूर केली होती.

  आंध्र प्रदेशात ब्लॅक & व्हाइट
  मोदींच्या दौऱ्यास विरोध करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी काळे कपडे परिधान करून कार्यालय गाठले. मोदी जशोदा बेन यांचे पती. त्यांनी पत्नीचा सन्मान केला नाही, असे ते म्हणाले. बाबूगार सनराइझचे (सूर्योदय) वचन देऊन सत्तेवर आले होते. पण मुलाचा उदय करण्यात गुंतले आहेत, अशी टीका मोदींनी चंद्राबाबूंवर केली.

  गो बॅक : टीडीपी, तुमची इच्छा पूर्ण होईल : मोदी
  आंध्रात पाऊल ठेवताच टीडीपीच्या लोकांनी माझे ‘मोदी गो बॅक’ असे सांगितले. मला देशातील कोट्यवधी लोकांवर पूर्ण विश्वास आहे. ते टीडीपीची इच्छा पूर्ण करतील. पुन्हा दिल्लीत सरकारमध्ये ते बोलावतील, असे मोदींनी सांगितले. नायडू अमरावतीपासून कोलावतीपर्यंत संपत्ती वाढीच्या कामात व्यग्र आहोत. खरे तर ते चौकीदारामुळे त्रस्त आहेत. त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. मला आशीर्वाद देण्यासाठी जनसागर उसळला आहे. बाप-लेकाचे सरकार जाण्याच्या मार्गावर आहे. आपल्याकडे शुभ कार्यावेळी कुटुंबप्रमुखाला काळा तिलक लावण्याची परंपरा आहे. तुम्ही काळे फुगे दाखवले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो, असे मोदींनी सांगितले.

  नवी सुरुवात : टीडीपी रालोआतून बाहेर पडल्यानंतरचा मोदींचा पहिलाच आंध्र दौरा
  गतवर्षी टीडीपी रालोआतून बाहेर पडली होती. त्यानंतर मोदी पहिल्यांदाच आंध्रात दाखल झाले. पंतप्रधानांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये १ हजार १२५ कोटी रुपये खर्चून पेट्रोलियम केंद्र राष्ट्रार्पण करण्यात आले. त्याची क्षमता १३ लाख ३० हजार टन आहे. ५७०० कोटी रुपये खर्चून कृष्णा गोदावरी खोऱ्यात बनवलेल्या ओएनजीसी प्रकल्पाचे लोकार्पण झाले. कृष्णापट्टणममध्ये ५८० कोटींच्या बीपीसीएल प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.


  विकास : पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडू, कर्नाटकात अनेक योजनांचा शुभारंभ
  पंतप्रधानांनी रविवारी तामिळनाडूतील तिरुपूरमध्ये जाहीर सभा घेतली. तत्पूर्वी येथूनच चेन्नई मेट्रो रेल्वे, सहा भुयारी स्थानकांचेही उद्घाटन केले. तिरुपूरमध्ये १०० खाटांचे ईएसआयसी रुग्णालय, त्रिची विमानतळाची नूतन इमारत, चेन्नई विमानतळाचा दुसरा टप्पा, आधुनिकीकरण योजनांचे भूमिपूजनही त्यांनी केले. मोदींनी कर्नाटकातील रायचूरमध्ये जाहीर सभा घेतली. धारवाडमध्ये आयआयटीच्या कोनशिला समारंभासह अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन केले.

Trending