आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकत्व सुधारणा कायदा आणून मोदींकडून देशात द्वेषाचे राजकारण - कन्हैया कुमार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - देशात विविध प्रकारच्या समस्या असताना नागरिकत्व सुधारणा कायदा आणून लक्ष विचलित करण्याचे काम केंद्र सरकारकडून होत आहे. आमचा नागरिकत्व देण्याला नाही तर नागरिकत्व काढून घेण्याला विरोध आहे, असे नमूद करीत मोदी सरकारकडून द्वेषाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी मंगळवारी(दि.२८) पाथरी येथे केला. 

नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्याच्या निषेधार्थ पाथरी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.  या वेळी सभेचे आयोजक आ. बाबाजानी दुर्राणी, मुजाहेद खान, कॉ.राजन क्षीरसागर, मुंजाजी भाले पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, पंचायत समितीचे सभापती कल्पना थोरात, नगराध्यक्षा मीना भोरे, सारंगधर महाराज, दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, चक्रधर उगले, अनिल नखाते, माधवराव जोगदंड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या भाषणात कन्हैयाकुमार पुढे म्हणाले की, देशात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असताना या गंभीर विषयांकडे लक्ष देवून त्यावर उपाययोजना करण्याऐवजी केंद्र सरकारने नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणलेला आहे. केवळ हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचे काम करीत द्वेषाचे राजकारण मोदी सरकारकडून होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. नागरिकत्व कायदा हा कागदावर ठरणार असून आज अनेक कुटुंबीयांकडे कागदपत्रे नाहीत. त्यांना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. अनेक जण यामुळे घुसखोर ठरतील. त्यामुळे नागरिकत्व देण्याला विरोध नाही तर नागरिकत्व काढण्यास आमचा विरोध असून तो शेवटपर्यंत कायमच राहील, असा इशाराही कन्हैया कुमार यांनी दिला. संपूर्ण भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावरच टीकेचा सूर ठेवला.

बातम्या आणखी आहेत...