भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी हरियाणातील झज्जर आणि राजस्थानातील पाली आणि नागौरमध्ये जाहीर सभा घेतल्या. त्यांनी कोणाचेही नाव न घेता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे भावजी रॉबर्ट वढेरा यांना लक्ष्य केले. तीन महिन्यात एक रुपयादेखील खर्च न करता 50 कोटी रुपये कमवणे केवळ युवराजांच्या कुटुंबालाच जमू शकते.
घराणेशाही लोकशाहीचा शत्रू आहे. परंतु हरियाणामध्ये पिता-पुत्राचा कारभार आहे. दिल्लीत आई-मुलाचा कारभार आहे. त्यात काही कमी पडले म्हणून की काय जावयांचा (रॉबर्ट वढेरा) यांचा खेळ चालू झाला आहे. भावजींनी एक पैसाही न लावता तीन महिन्यांत 50 कोटी रुपये जमवले. अशी कला जमणारा येथे कोणी जादूगार आहे का ? याविषयी केवळ युवराजांच्या कुटुंबालाच ठाऊक आहे.
पाली - पहिल्यांदाच जावई पॉवर
न्यूक्लिअर पॉवर, हायड्रो पॉवर, विंड पॉवर, सोलार पॉवर तर सर्वांनीच ऐकले आहे. परंतु राजस्थानमध्ये पहिल्यांदाच जावई पॉवर अशा आशयाचा शब्द ऐकायला मिळतोय. शेतकर्यांची हजारो एकर जमीन युवराजांच्या भावजींना देण्यात आली आहे. सोलर पॉवर मंडळदेखील तयार करण्यात आले. परंतु राजस्थानमध्ये नंतर त्याचे जावई पॉवरमध्ये रूपांतर झाले.
युवराजांना यंदाच्या निवडणुकीत जनतेचा संताप पाहायला मिळेल
काँग्रेसचे नेते आपल्या कामाचा हिशेब जाहीर करत नाहीत. वास्तविक लोकशाहीत सत्तेवर असलेल्या पक्षाने कामाचा हिशेब जनतेमध्ये जाऊन दिला पाहिजे. युवराज म्हणतात, ते असंतोषाचे राजकारण करत नाहीत. खरे तर काँग्रेसने 60 वर्षे असे राजकारण केले आहे आणि आता आम्हाला शांतीपाठ शिकवला जातोय. आता त्यांना या निवडणुकीत लोकांचा राग दिसेल.
झज्जर - युवराजांकडून पंतप्रधानांचा अपमान
युवराज, तुम्ही आम्हाला संयम आणि आदर्श भाषेविषयी उपदेश देत आहात. तुम्हीच देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला. ते अमेरिकेला गेले होते, तेव्हा तुम्ही कॅबिनेटचा निर्णय फाडून टाकण्याची भाषा पत्रकारांसमक्ष केली होती.
नागौर - जे पक्ष वाचवू शकले नाही, ते देश काय वाचवणार ?
जो व्यक्ती पक्ष वाचवू शकत नाही, तो देशाला कसा वाचवणार ? केंद्र सरकारचा पराभव अटळ आहे. त्यांना अखेरचा निरोप कसा द्यायचा, हे ठरवण्याची सध्याची वेळ आहे. सात पिढ्यांनी कधी पाहिली नसेल असा निरोप काँग्रेसला द्यायची आहे.